आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत योगाच्या यशकथेवर भव्य-दिव्य प्रदर्शन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एकोणिसाव्या शतकात अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी झालेल्या आणि आता जगभरातील लोकांसाठी क्रेझ ठरलेल्या योगाची महती सांगणारे प्रदर्शन वॉशिंग्टनमध्ये भरवले जाणार असून शिल्प, छायाचित्रे, चित्रकला, पुस्तके आणि चित्रपटाच्या माध्यमातून योगमाहात्म्य सांगितले जाणार आहे.

फक्त योगासाठी वाहिलेले ‘योगा : परिवर्तनाची कला’ हे पहिलेवहिले महाप्रदर्शन ऑर्थर एम. सॅकलर गॅलरीमध्ये भरवण्यात येणार आहे. या गॅलरीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त हे प्रदर्शन 19 ऑक्टोबरपासून भरवण्यात येत आहे. हे प्रदर्शन 26 जानेवारी 2014 पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात मुगल सम्राट जहांगीर बनलेल्या प्रिन्स सलीमसाठी तयार करण्यात आलेल्या योगासनांच्या सचित्र मालिकेतील 10 फोलिओ ठेवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात तिसºया शतकापासून ते 18 व्या शतकापर्यंतच्या मूर्ती आणि चित्रकलांसह वसाहतवादाच्या काळाबरोबरच आधुनिक युगातील छायाचित्रे, पुस्तके आणि चित्रपट असे 40 महत्त्वाचे दस्तऐवज मांडले जाणार असून त्याद्वारे 19 व्या शतकात योगा ही अंधश्रद्धा कशी मानण्यात येत होती आणि विसाव्या शतकात ती आरोग्याच्या गुरुकिल्लीची कला कशी ठरली, हे दाखवले जाणार आहे.

प्रदर्शनात बहराल हयात संहिता
योग आणि योगासनांची माहिती 1602 मध्ये लिहिलेल्या ‘बहराल-हयात’ या पांडुलिपीमध्ये देण्यात आली आहे. त्यामध्ये योगाची शास्त्रोक्त आसन पद्धती वर्णन करण्यात आली आहे. हे हस्तलिखितही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. हे हस्तलिखित अत्यंत महत्त्वाचे असून तीन तज्ज्ञांनी त्याचा अभ्यास केला आहे. 13 व्या शतकात हौसला राजघराण्याच्या काळातील भैरव देवतेची मूर्ती हेही या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण राहणार आहे.

2008 पासून तयारी
या प्रदर्शनाची तयारी 2008 पासून करण्यात येत आहे. या प्रकल्पावर इतिहास, कला इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान आदी विषयांतील तज्ज्ञ काम करत आहेत. 26 जानेवारी 2014 रोजी ऑर्थर एम. सॅकलर गॅलरीत समावेश झाल्यानंतर 21 फेब्रुवारी ते 25 मे 2014 पर्यंत सॅन फ्रान्सिस्को एशियन आर्ट म्युझियम आणि 22 जून ते 7 सप्टेंबर 2014 पर्यंत क्लेव्हलँड म्युझियममध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.