गांधीनगर- गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल आणि नरेंद्र मोदी यांचे सख्य कसे आहे हे अख्या देशाला माहित आहे. गुजरातमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती करताना राज्यपाल बेनिवाल यांनी राज्य सरकारला विश्वासात घेतले नाही म्हणून ती नियुक्ती रद्द करावी यासाठी मोदींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यामुळे राज्यपाल बेनिवाल आणि मुख्यमंत्री मोदी यांचा वाद देशभर गाजला होता.
पण त्याच कमला बेनिवाल यांनी आता मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची प्रशंसा केली असून, गुजरातचा विकास ज्या वेगाने होत आहे ते पाहता तो देशाला कलाटणी देणारा आहे, असे मत व्यक्त केले आहे. मोदींच्या जबरदस्त नेतृत्त्वामुळे व चांगल्या प्रशासनामुळेच हे शक्य झाल्याचे बेनिवाल यांनी म्हटले आहे.
गुजरात सध्या देशासमोर रोल मॉडेल म्हणून पुढे येत आहे. मोदींनी जो विकासाचा रास्ता निवडला आहे ते पाहता देशातील लोकांचा त्यांच्याबाबत दृष्टीकोन झपाट्याने बदलत चालला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बेनिवाल नव्या विधान मंडळाच्या इमारतीच्या उदघाटन समारंभात त्या बोलत
यावेळी बेनिवाल यांनी नव्या विधानमंडळात निवडून आल्याचे सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. विशेषत त्यांनी नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, मोदी यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली गुजरातमध्ये मागील ११ वर्षे चांगले सरकार दिल्यामुळेच ते पुन्हा निवडून आले आहेत. याचे त्यांना श्रेय जातेच. येथील लोकांची चांगले काम करण्याची परंपरा आहे. लोकांचा सहभाग ही राज्याला, देशाला पुढे नेत असतो. मोदींनी जी सदभावना मिशन काढली त्यामुळे प्रदेशात शांतता, सौख्य नांदायला मदत झाली असल्याचेही बेनिवाल यांनी सांगत त्यांचे तोंडफरून कौतुक केले.