आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Heavy Rains Lash Mp, Villages Flooded, Highways Cut Off

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाचे थैमान : उत्तर भारतात महापूर; मध्य प्रदेशात 25 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ,लखनऊ,नवी दिल्ली - महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतात दुष्काळसदृश परिस्थिती असताना उत्तर भारतातील अनेक राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मध्य प्रदेशात मंगळवारी मुसळधार पावसाने 9 बळी घेतले.यापैकी तीन बळी एकट्या राजधानी भोपाळ मधील आहेत.पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मध्य प्रदेशात आतापर्यंत 25 बळी गेले आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पुराने वेढले असून केरळ आणि दिल्लीतही मंगळवारी जोरदार पाऊस झाला.
मंगळवारी मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यातील प्रमुख नदी नर्मदेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीच्या काठावरील जिल्हे जलमय झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. राज्य सरकारने भोपाळ,रायसे आणि होशंगाबाद येथील शाळा, महाविद्यालयांना पुढील दोन दिवस सुटी जाहीर केली आहे. पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी इटारसी येथील तवा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.
दरम्यान, पूरग्रस्त भागाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिले. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनीही होशंगाबाद जिल्ह्यात तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. छत्तीसगडलाही प्रचंड पावसाचा तडाखा बसला आहे. राज्यात 6 जण ठार झाले आहेत. पावसामुळे सोयाबीन आणि भातशेतीला फायदा झाला आहे.
महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा : उत्तर भारतात पावसाने कहर केला असला तरी महाराष्ट्रात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. खरिपातील मूग, उडीद पिके हातची गेल्यात जमा आहेत. सोयाबीन, कापूस पिकासाठी आता पावसाची नितांत गरज आहे. औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद या जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती आहे. अनेक प्रकल्प अजूनही कोरडे आहेत.
नेपाळात पूर, उत्तर प्रदेशाला फटका
नेपाळमधून येणा-या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत हाहाकार उडाला आहे. हजारो एकरातील पिके वाहून गेली आहेत. बहराइच व बाराबंकी जिल्ह्यात घागरा नदीला पूर आला आहे. पुरामुळे शेकडो लोक बेघर झाले आहेत. मेरठमध्ये गंगेचे पाणी अनेक गावांत घुसले आहे. केंद्रीय जल आयोगानुसार शारदा, घागरा, रावी नद्यांनी अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाराणसी जिल्ह्यात गंगा तर फैजाबाद जिल्ह्यातील शरयू नदी दुथडी भरून वाहत आहेत. अनेक वस्त्यांत पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी लष्कराची मदत घेण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातही पाऊस पडतो आहे.
केरळात पावसाचे सात बळी - केरळात पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. कोझीकोडे जिल्ह्यांत दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. मदतकार्य सुरू असून जोरदार पाऊस सुरूच आहे.
पावसाची संततधार राहणार - हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, पशिचम राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये आगामी 48 तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.
PHOTOS : मध्य प्रदेशात अतिवृष्टीमुळे नर्मदेचे रौद्ररूप