आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेलिकॉप्टर करार रद्द होणार - संरक्षण मंत्रालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/रोम - वादग्रस्त ऑगस्टा हेलिकॉप्टर व्यवहारात कोट्यवधी रुपयांची दलाली देण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने हा करारच रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हेलिकॉप्टर पुरवठा करणा-या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला तशी नोटीस जारी करण्यात आली असून सात दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले कनिष्क सिंह यांच्या भूमिकेबद्दल भाजपने शंका व्यक्त केली असून तसे पत्र सीबीआयला पाठवले आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. इटलीमध्येही याचे पडसाद उमटले आहेत. तेथील मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर खरेदीतील व्यवहारात लाचेची रक्कम ट्युनेशियामार्गे भारतात पोहोचली होती.

सुमारे 3600 कोटींच्या या करारात भारत आणि इटली या दोन्ही देशांत एकूण 360 कोटी रुपयांची लाच दिली गेली असल्याचा आरोप आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सीतांशु कार यांनी शुक्रवारी सांगितले की, कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या व्यवहाराशी संरक्षण मंत्रालयाच्या नेमक्या कोणकोणत्या व्यक्ती संबंधित आहेत, याचा शोध सीबीआय घेत आहे.

कनिष्क सिंह संशयाच्या जाळ्यात
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कनिष्क सिंह यांची भूमिका संशयास्पद असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सीबीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दलाल गायडो रॉल्फ हाश्क याच्याशी सिंह यांचे संबंध तपासले पाहिजेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सिंह यांचे वडील एस. के. सिंह संबंधित कंपनीचे प्रमोटर होते. ‘लटेरा 43’ या इटलीतील वर्तमानपत्राचा हवाला देऊन सोमय्यांनी म्हटले आहे की, दलाल ख्रिश्चियन मिशेलचे वडीलही काँग्रेसशी संबंधित आहेत.

कनिष्क सिंह कोण?
कॉम्प्युटर इंजिनिअर असलेले कनिष्क राजस्थानचे माजी राज्यपाल एस. के. सिंह यांचे चिरंजीव. 2003 मध्ये ते राजकारणात आले. 2004 पासून राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. सोनिया गांधींसाठी रायबरेलीमध्ये घरोघर जाऊन त्यांनी प्रचार केला.

भाजपचे प्रश्न : भाजपने केंद्राला काही प्रश्न विचारले आहेत. ते असे : कराराला अंतिम रूप कुणी दिले, स्वाक्ष-या कुणी केल्या, लाच कुणी घेतली, ‘द फॅमिली’ कोण आहे? (इटली कोर्टातील आरोपपत्रात द फॅमिलीला 200 कोटी दिल्याचा उल्लेख आहे.), आयडीएस कंपनी आहे तरी काय? केंद्राने इटलीशी पत्रव्यवहार केला आहे का?

फिनमेक्कानिका कंपनीच्या प्रमुखांनी दिला राजीनामा
फिनमेक्कानिकाचे सीईओ ओरसी यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. सोमवारी त्यांना लाच प्रकरणी अटक झाली. इटलीचे पंतप्रधान मारियो माँटी यांनी या प्रकरणात सखोल चौकशीचे आश्वासन देऊन या सरकारी कंपनीतील व्यवहार पारदर्शक व्हावेत म्हणून सर्वतोपरी उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.