आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदीत कॉमन लँग्वेज होण्याची ताकद : भालचंद्र नेमाडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - कोणतीच भाषा आंतरराष्‍ट्रीय भाषा म्हणून कायमची टिकून राहत नाही. ग्रीक, लॅटिन जशा कालांतराने आंतरराष्‍ट्रीय पातळीवरून लुप्त झाल्या तशीच इंग्रजीही जाईल, असे मत विख्यात साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज व्यक्त केले. जयपूर लिटररी फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी, ‘इंग्लिश-हिंदी भाई -भाई’ या सत्रात ते बोलत होते.
‘हिंदीमध्ये खरोखर भारताची एकमेव राष्‍ट्र भाषा कॉमन लँग्वेज होण्याची ताकद आहे. कारण जे हिंदी बोलतात ते दुसरी भाषा शिकण्याचा फारसा प्रयत्न करताना दिसत नाहीत. मुंबईतले भाजीवाले बहुतांश हिंदी आहेत.

त्यामुळे तिथल्या सर्व मराठी महिला भाजीच्या विश्वातले सर्व हिंदी शब्द शिकल्या आहेत,’ असे उदाहरण त्यांनी दिले. या सत्रात प्रसिद्ध हिंदी लेखक अशोक वाजपेयी, शांतिनिकेतनचे प्र. कुलगुरू व व्याकरणतज्ज्ञ उदय नारायण सिंह, हिंदी लेखिका व भाषांतरकार इरा पांडे सहभागी झाले होते. भाषांनी व्याकरणाचा कितपत बाऊ करावा यावर तज्ज्ञांची मते वेगवेगळी होती. वाजपेयी म्हणाले की, शुद्ध भाषेचा दबाव कायम राहिलाच पाहिजे तर इरा पांडे यांनी घरात बोलण्याची व लिहिण्याची/साहित्याची भाषा वेगळी असली पाहिजे, असे मत मांडले.


वाजपेयींनी सांगितले की, ‘शुद्ध हिंदी लिहिणा-या ची संख्या कमी होतेय तशीच अशुद्ध इंग्रजी लिहिणा-या ची वाढतेय. आम्हा धवलकेशींना तेही खटकतेच.’ उदय नारायण सिंह यांनी भाषेच्या लोकशाहीकरणाविषयी सांगितले की, बिगरइंग्रजी लेखकांनी इंग्रजीतून लिहिताना प्रमाण इंग्रजी भाषा हवी तशी वळवली, ज्याने इंग्रजी भाषा व साहित्य दोन्ही समृद्ध झाले तसेच हिंदीचेही होत आहे. परंतु हिंदीच्या 49 सहभाषा आजही फारशा मुख्य प्रवाहात आलेल्या नाहीत. अनुवादाने ती भाषा समृद्ध होते. मूळ भाषेतली संस्कृती त्यामुळे अनुवादित भाषेला मिळते, असे ते म्हणाले.


डीएससी पुरस्कार जीत थयिल यांना जाहीर
या महोत्सवात प्रतिष्ठेचा ‘डीएससी’ पुरस्कार मल्याळी लेखक जीत थयिल यांना ‘नार्कोपोलिस’ या कादंबरीसाठी जाहीर करण्यात आला. 50 हजार डॉलरचा हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जीत थयिल यांनी हा आपला मोठाच सन्मान असल्याचे म्हटले. लेखकासाठीही पैसा महत्त्वाचा असतोच, तो तसा नसतो असे म्हणणारे खोटे बोलत असतात, असेही ते म्हणाले.