आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Historian Ramachandra Guha\'s Opinions Over Narendra Modi\'s Persanlity...

इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच नरेंद्र मोदींमध्येही \'हुकुमशाही प्रवृत्ती\'- गुहा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात 1970 च्या दशकात इंदिरा गांधी यांनी ज्याप्रमाणे एकाधिकारशाहीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारचे राजकारण नरेंद्र मोदी करु पाहत आहेत, असे मत ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी आपल्या लेखात व्यक्त केले आहे.

गुहा यांनी शुक्रवारी 'द हिंदू'मध्ये नरेंद्र मोदींबाबत लिहलेल्या लेखात त्यांची तुलना इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारभाराबरोबर केली आहे. तसेच मोदींमध्ये इंदिरा गांधींचा राजकीय वृत्तीचा अंश दिसतो, अशी टिप्पणी करीत मोदींच्या संभाव्य पंतप्रधानपदावर सडकून टीका केली आहे.

गुहा म्हणतात, नरेंद्र मोदी यांचे स्वकेंद्रित राजकारण करण्याची स्टाईल आहे. त्यांना अंहकार आहे. ते कोणाचेही म्हणणे ऐकू शकत नाहीत. उलट ते दुस-यांवर आपले म्हणणे रेटतात. ते फार महत्त्वकांक्षी नेते आहेत. याचे उदाहरण पाहायचे असेल तर त्यांची द टेलिग्राफमधील 18 जानेवारी 2013 ची मुलाखत वाचा. मोदी त्यात म्हणतात, गुजरात एक समुद्रकिना-यावर वसलेले राज्य आहे. तेथे काहीही नैसर्गिक स्त्रोत नाहीत. गुजरातमध्ये ओरिसाप्रमाणे स्टील सापडत नाही, झारखंडप्रमाणे कोळसा सापडत नाही तर आसाम-बंगालप्रमाणे येथे हि-याच्या खाणी नाहीत. तरीही मी गुजरातचा विकास करुन दाखवला. जर मला तसे प्रदेश मिळाले असते तर मी देशाचा चेहरा बदलून टाकला असता असे मोदी आपल्या मुलाखतीत म्हणतात. ते 'मी' म्हणत आहेत 'आपण' असा ते उल्लेख करताना आढळत नाहीत. त्यावरुन त्यांच्यात राज्य करण्याची कोणती प्रवृत्ती दडली आहे, हे कळून येईल, असेही गुहा म्हणतात.

इंदिरा गांधींप्रमाणेच नरेंद्र मोदी यांच्यात हुकुमशाही प्रवृत्ती असल्याचे सांगताना गुहा आपल्या लेखात पुढे म्हणतात, इंदिरा यांनी देशात 1971-1977 या काळात हुकुमशाही प्रवृत्तीने व एकाधिकारशाहीने राजकारण केले. मोदीही तसेच राजकारण करीत आहेत. इंदिरा गांधींनी मुलगा संजयच्या साथीने आणीबाणीसह स्वातंत्र्याची गळचेपी केली. तत्कालीन पक्षातही फक्त इंदिरा जे म्हणेल तेच होत असे. इतर काँग्रेसजणांना त्यावेळी मत मांडण्याचा अधिकार नव्हता. इंदिरा स्वत: निर्णय घेत व राबवत असत. मोदींच्या बाबतीत तीच स्थिती आहे. यासाठी गुहा गुजरातमधील 2002च्या दंगलीचे उदाहरण देतात. तसेच या घटनांना काँग्रेस पक्षही अपवाद नसल्याची आठवण गुहा करुन देतात. 1984 साली इंदिरांच्या हत्येनंतर दिल्लीतील हजारो शिख लोकांची हत्या झाल्याची आठवण करुन देतात.

मोदी मात्र आता चेहरा बदलू पाहत आहेत. ते विकासाच्या नावाखाली आता जातीयवाद झाकू पाहत आहेत. ते विकासाच्या कितीही कल्पना रंगवत असले तरी मला गुजरातचा परिपूर्ण विकास झालेला नाही. तसेच गुजरात देशातील सर्वोत्तम राज्य नसल्याचे गुहा सांगतात. ते म्हणतात, मी नुकताच गुजरातमध्ये फिरुन आलो. सौराष्ट्रात गेलो होतो तेथील जमिन आजही पाण्याविना आहे. तेथील लोक आजही हलाखीचे जीवन जगताना दिसत आहेत. शहरी भागात सुधारणा झाल्या आहेत. तरीही गुजरात बेस्ट राज्य ठरु शकत नाही. त्यापेक्षा केरळ, हिमाचल प्रदेश व तामिळनाडू (भ्रष्टाचार वगळता) या राज्यांतील लोकांत गुजरातपेक्षा चांगले व उच्च राहणीमान, जीवनमान आहे.

मोदींचे काही बाबतीत कौतूक करतानाही ते त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढतात. ते म्हणतात, मोदींनी इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत चांगले काम केले आहे. शाळा, रुग्णालये यांचा दर्जा सुधारवला आहे. याचबरोबर भ्रष्टाचारमुक्त सरकार व प्रशासन चालवले. परदेशी गुंतवणुकदारांसह राज्यात उद्योगधंदे वाढविले. पायाभूत सुविधा तयार करताना ऊर्जेसारख्या महत्त्वाच्या घटकाकडे विषेश लक्ष दिले त्यामुळे या बाबतीत मोदी सरस ठरतात. तरीही यामागे त्यांचा एकाधिकारशाही पद्धतीचा कारभारच कारणीभूत ठऱतो, असे सांगत त्यांनी केलेल्या विकासाचे श्रेय काढून घेतात.

मोदींवर उपाहासात्मक टीप्पणी करताना गुहा म्हणतात, मोदी जर पंतप्रधान झाले तर देशाचा जीडीपी अचानक 10 टक्क्यांवर जाईल. रेल्वे वेळेत धावतील, विमाने वेळीच उड्डाणे करतील. बडे नोकरशहा एका रात्रीत फाईल्स क्लिअर करतील. प्रशासन व राजकीय भ्रष्टाचार नाहीसा होईल, देशातील गरीबी नाहीशी होऊन शून्य टक्केवर येईल. त्यामुळे मोदींचे सर्वत्र कौतूकच कौतूक होईल व वृत्तपत्राचे रखानेच्या रखाने भरतील व इंटरनेट विश्वात फक्त मोदींचाच आवाज असेल.

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी 'फिट' बसत नसल्याचे सांगत गुहा म्हणतात, ते आक्रमक आहेत. त्यांच्यात 'मी' पणा प्रचंड आहे. जे काही करायचे ते मी करेन. तसेच जे काही झाले आहे त्याबाबत मला माहिती हवीच, अशी वृत्ती त्यांच्यात दिसते. काही समाजशास्त्रज्ञांच्या समोर मोदी फक्त 15 मिनिटे बोलले तरी त्यांचा स्वभाव व वृत्ती ते ओळखू शकतात. कारण त्यांच्या मार्गात येणा-या कोणत्याही व्यक्तीला बाजूला सारुन पुढे जाण्याची वृत्ती त्यांच्यात दिसून येते.

गुहा मोदींच्या रुबाबदार व्यक्तीमत्त्वाबाबतही मत व्यक्त करतात, ते म्हणतात, मोदींच्या छप्पन इंच छातीपुढे ते आपले म्हणणे रेटतात. त्यांच्या मर्दानी 56 इंचाच्या छातीपुढे दुसरा कोणताही माणूस उभा राहू शकत नाही. त्यामुळेच गुजरातमध्ये त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही नेता पॉवरफूल तुम्हाला दिसत नाही.

मोदींच्या सार्वजनिक जीवनातील खुलासा करताना गुहा म्हणतात, मोदी यांनी आपल्या राज्यात एकदा योगशिबाराचे आयोजन केले होते. त्यात राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डीएम, डीसीपासून सचिव ते त्यांच्या खाली काम करणारे वेगवेगळ्या प्रकारातील अधिका-यांना त्यांनी योगा करायला भाग पाडला होता. मोदींच्या समोर या अधिका-यांनी सुर्यनमस्काराचा योगा प्रकार केल्यानंतर ऊठ-बैठ असा प्रकार चालविला होता. तो एकदा दोनदा नव्हे तर तब्बल २०-२५ वेळा असाच प्रकार सुरु होता. याऐवजी त्यांनी अधिका-यांना राज्यात काम कसे करावे ते शिकवले असते तर देशाला फायदा होईल.

मोदी यांच्या प्रवृत्तीत बसणारे देशात अनेक नेते आहेत. ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती (मुख्यमंत्रीपदाच्या काळात) हे नेते त्यांच्या राज्यात स्वत:च्या म्हणण्याप्रमाणे राजकारण चालवतात. नविन पटनाईक व नितीशकुमारही त्याच पठडीतले आहेत, त्यांच्यावरही लोक असेच आरोप करतात. मात्र मोदी यांनी राष्ट्रीय राजकारणाविषयी महत्त्वकांक्षी असून, तशी इच्छा त्यांनी प्रकट केली आहे. मात्र याबाबत राहुल गांधी फारच मागे असून ते याबाबत फार उत्साही असल्याचे दिसत नाही, असे मतही गुहा व्यक्त करतात.

रामचंद्र गुहा यांनी राहुल गांधी यांच्याबाबतीतही भाष्य केले होते, वाचण्यासाठी पुढील बातमीला क्लिक करा...राहुल गांधी यांनी राजकारण सोडून दुसरा धंदा शोधावा