आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई - आपल्या ‘विश्वरूपम’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादंगामुळे अभिनेता कमल हासन अडचणीत आला आहे. न्याय मिळाला नाही तर देश सोडून निघून जाईन, असा इशारा त्याने बुधवारी दिला. त्यानंतरही मद्रास हायकोर्टाने ‘विश्वरूपम’च्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. कमल हासनची चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याची तयारी आहे. मुस्लिम संघटनांनी काही दृश्ये आणि शब्दांवर हरकत घेतली आहे.
कमल हासनसाठी बुधवार नाट्यपूर्ण ठरला. मंगळवारी रात्री मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती के. वेंकटरमण यांनी विश्वरूपम तामिळनाडूत प्रदर्शित करण्यास मंजुरी दिली. बुधवारी दुपारनंतर हायकोर्टाच्या दोनसदस्यीय खंडपीठाने रात्रीचा निर्णय रद्दबातल ठरवला आणि प्रदर्शनावर 6 फेब्रुवारीपर्यंत बंदी घातली. मुख्य कार्यकारी न्यायाधीश ई. धर्मराव व न्यायमूर्ती अरुणा जगदीशन यांच्या पीठाने म्हटले की, चित्रपट रिलीज झाल्यास कायदा-सुव्यवस्था बिघडेल. या प्रकरणी पुढील बुधवारी सुनावणी होणार आहे.
आधी दिले समेटाचे संकेत
न्यायालयाच्या निर्णयापूर्वी कमल हासनने म्हटले की, मुस्लिम नेत्यांशी चर्चा करून आपण प्रकरण मिटवले आहे. चित्रपटातील कुराणशी संबंधित काही दृश्ये आणि शब्द वगळण्याची आपली तयारी आहे. मुस्लिम नेत्यांनीच त्याची यादी दिली आहे. आपला चित्रपट भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नसून, त्यांच्या समर्थनार्थच आहे, असे कमल हासन याने म्हटले आहे.
...नंतर भावनिक धमकी
पत्रकार परिषदेत कमल हासन म्हणाला की, राजकीय खेळाचा मी बळी ठरलो आहे. चित्रपटासाठी मी संपत्ती गहाण ठेवली आहे. घरदेखील गमावून बसलो आहे. आता गमावण्यासारखे काही उरले नाही. निकाल माझ्या बाजूने लागला नाही तर मला एखादी धर्मनिरपेक्ष जागा शोधावी लागेल. भारतात जर असे राज्य मिळाले नाही तर मी परदेशात निघून जाईन.
वादाचा प्रवास असा
‘विश्वरूपम’वरून काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर तामिळनाडू सरकारने 23 जानेवारी रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनावर 15 दिवसांसाठी बंदी घातली होती. कमल हासन मद्रास हायकोर्टात गेले. न्यायमूर्ती वेंकटरमण यांनी 26 जानेवारी रोजी चित्रपट बघितला, परंतु कमल हासनला चर्चेतून तोडगा काढण्याचे सांगितले. तोडगा न निघाल्याने न्यायालयाने मंगळवारी रात्री बंदी उठवली. तामिळनाडू सरकारने पुन्हा अर्ज दाखल केला. चित्रपट हिंदीत 5 फेब्रुवारीला रिलीज होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.