आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increasing The Loss,so Per Month Diseal Price Hike Moilee

तोटा वाढल्यामुळे दरमहा डिझेल महागणार : मोईली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तेल कंपन्यांचा तोटा जोवर भरून निघत नाही तोवर डिझेलचे दर वाढत राहतील. पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी हे स्पष्टपणे बजावले. दर महिन्याला कंपन्या डिझेलचे दर 40 ते 50 पैसे वाढवू शकतील, असे तेल कंपन्यांना सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले. पुढील आदेश येईपर्यंत ही वाढ होत राहील. डिझेल विक्रीवर आजही कंपन्यांना लिटरमागे 10.80 रुपयांचा फटका बसत असल्याचा मोईलींचा दावा आहे.

पेट्रोल पंपचालक ठोक खरेदी करत असल्याबद्दल मोईली यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणी चौकशी करून कठोर नियमावली तयार केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गेल्या 17 जानेवारीला केंद्र सरकारने डिझेल दरवाढीबाबत दुहेरी धोरण जाहीर केले होते. यानुसार ठोक खरेदीसाठी डिझेलचे दर बाजारभावानुसार तर किरकोळ विक्री अंशत: नियंत्रणमुक्त केली होती. त्यानुसार तेल कंपन्यांना दर महिन्याला डिझेलची दरवाढ करता येणार आहे. या धोरणाचे मोईली यांनी जोरदार समर्थन केले. कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पेट्रोल नियंत्रणमुक्त केल्यानंतर त्याची दरवाढ सरकारी तेल कंपन्यांच्या अखत्यारीत गेली आहे. याचप्रमाणे आता डिझेलही काही प्रमाणात नियंत्रणमुक्त करण्यात आले आहे. मात्र, याचा परिणाम थेट सार्वजनिक परिवहन सेवेवर होत असल्याने याचे नियंत्रण पूर्णपणे कंपन्यांच्या ताब्यात नाही. काही प्रमाणात वाढ करण्याची मुभा सरकारने दिली आहे.

पंपावरून डिझेल घेण्यापेक्षा राज्ये करकपात का करत नाहीत?
‘गुजरात, तामिळनाडूसह अनेक राज्यांनी आपल्या परिवहन मंडळांना स्थानिक पेट्रोल पंपांकडून डिझेल खरेदी करण्यास सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे. हे चुकीचे आहे. यासाठी नियम बदलण्याचा सरकारचा विचार आहे. बस पेट्रोलपंपांवर पाठवण्यापेक्षा राज्य सरकारे व्हॅट आणि सेल्स टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न का करत नाहीत, जेणेकरून डिझेल आपोआप स्वस्त होईल.’
वीरप्पा मोईली, पेट्रोलियममंत्री