आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अग्नि-5\'नंतर आता भारताची \'अग्नि-6\'ची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- भारत अण्‍वस्‍त्र आणि क्षेपणास्‍त्र सज्‍जतेमध्‍ये एक मोठी झेप घेण्‍याच्‍या तयारीत आहे. भारताने अतिशय महत्त्वाकांक्षी 'अग्नि-6' आंतरखंडीय क्षेपणास्‍त्राच्‍या निर्मितीची तयारी सुरु केली आहे. यात भारत यशस्‍वी झाल्‍यास ही सुरक्षेच्‍या तसेच जागतिक पातळीवर देशाचा दबदबा वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने मोठी बाब ठरेल.

भारताने गेल्‍या वर्षी एप्रिलमध्‍ये 'अग्नि-5' क्षेपणास्‍त्राची चाचणी केली होती. या क्षेपणास्‍त्राची मारक क्षमता 5500 किलोमीटरपर्यंत आहे. संपूर्ण पाकिस्‍तान, अ‍फगाणिस्‍तान तसेच चीन आणि अर्धा रशिया 'अग्नि-5'च्‍या टप्‍प्‍यात आला आहे. त्‍यानंतर आता 'अग्नि-6' क्षेपणास्‍त्राची तयारी भारताने सुरु केली आहे. यासंदर्भात 'डीआरडीओ'चे प्रमुख व्‍ही. के. सारस्‍वत यांनी माहिती दिली. ते म्‍हणाले, 'अग्नि-6' ही भारताच्‍या दृष्‍टीने मोठी झेप ठरेल. हे क्षेपणास्‍त्र एकाच वेळी अनेक अण्‍वस्‍त्रे किंवा बॉम्‍ब वाहून नेण्‍यास सक्षम राहणार आहे. याशिवाय एकाच वेळी अनेक लक्ष्‍य भेदणेही शक्‍य होणार आहे. 'मल्टिपल टार्गेटेबल रिएन्‍ट्री व्‍हेकल' (एमआयआरव्‍ही) या तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले 'अग्नि-6' सध्‍या प्राथमिक अवस्‍थेत आहे. रचना कशी राहील, याबाबत काम झाले आहे. आता प्रत्‍यक्ष उभारणीची तयारी सुरु झाली आहे. 'अग्नि-6' व्‍‍यतिरिक्त विमानविरोधी तसेच क्षेपणास्‍त्रभेदी क्रूझ क्षेपणास्‍त्रही विकसित करण्‍यात येत असल्‍याचे सारस्‍वत यांनी सांगितले.

सारस्‍वत यांनी 'अग्नि-6'च्‍या मारक टप्‍प्‍याची माहिती दिली नाही. परंतु, 'अग्नि-5'पेक्षा याचा मारक टप्‍पा निश्चितच जास्‍त राहणार आहे. क्षेपणास्‍त्राची चाचणी यशस्‍वी झाल्‍यास अशी क्षमता असलेल्‍या अमेरिका आणि रशियाचा समावेश असलेल्‍या मोजक्‍या देशांच्‍या यादीत भारत समाविष्‍ट होईल, असे सारस्‍वत म्‍हणाले.