आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉप्टर करारासाठी भारतात 350 कोटी लाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ रोम - भारतामध्ये संरक्षण सौद्यासाठी लाच दिल्याच्या आरोपाखाली इटलीच्या एका बड्या कंपनीच्या प्रमुखास रोममध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 3600 कोटी रुपयांच्या सौद्यासाठी 350 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने या आरोपाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

हा संरक्षण सौदा 2010 मधील आहे. इटलीच्या फिनमेक्कानिका या संरक्षण कंपनीशी भारताने 12 अगस्टावेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता. त्यापैकी तीन हेलिकॉप्टर भारतात दाखलही झाले आहेत. उर्वरित हेलिकॉप्टर्स पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता आहे. फिनमेक्कानिकाचा प्रमुख जिउसेप्पे ओरसी याला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सोमवारी अटक करण्यात आल्याचे वृत्त अन्सा या इटालियन वृत्तसंस्थेने दिले आहे. अगस्टावेस्टलँडचे प्रमुख ब्रुनो स्पॅग्नोलिनी याला नजरकैदेत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिका-याने दिले आहेत, असे अन्य वृत्तांमध्ये म्हटले आहे. या लाचखोरी प्रकरणात इटली सरकारने स्वीत्झर्लंडस्थित दोन संशयित दलालांच्या हस्तांतरणाचा आग्रहही धरला आहे. दरम्यान, फिनमेक्कानिका कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीचे प्रमुख निर्दोष आहेत. लवकरच सत्य सर्वांसमोर येईल.

व्हीव्हीआयपींसाठी खरेदी
भारताने फेब्रुवारी 2010 मध्ये अगस्टावेस्टलँडशी तीन इंजिन असलेले एडब्ल्यू 101 हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अन्य व्हीव्हीआयपींसाठी वापरात येणा-या हवाई दलाच्या एलिट कम्युनिकेशन स्क्वॉड्रनसाठी हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आले आहेत. 3,600 कोटी रुपयांच्या या सौद्यात अमेरिकी कंपनी सिकरोस्कीला मागे टाकून अगस्टावेस्टलँडने हा सौदा खिशात घातला होता. प्रारंभी अर्थ मंत्रालय या सौद्यासाठी हो-नाही करत होते, मात्र नंतर तेही राजी झाले. संरक्षणविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत या सौद्याला मंजुरी देण्यात आली होती. हवाई दल आणि एसपीजीने नवीन हेलिकॉप्टरची गरज सांगितली होती, असे संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी सांगितले होते.

आधीही झाले आरोप, पण चौकशी नाही
फिनमेक्कानिका कंपनीने शस्त्रास्त्र सौद्यांमध्ये अवैध मार्गाने प्रचंड कमाई केली. इटलीच्या राजकीय पैशांना लाच दिली, अशा बातम्या याआधीही इटलीमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. भारताच्या हेलिकॉप्टर खरेदीचे प्रकरणही बातम्यांत होते. त्याबाबत भारताने चौकशी करणा-या संस्थेशी संपर्कही साधला होता, मात्र पुढे काहीच घडले नाही. इटलीकडून या प्रकरणाची विशेष अशी माहिती मिळू शकली नसल्याने औपचारिक चौकशी सुरू करता आली नाही, असे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी संसदेत सांगितले होते.