आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Italy Rejects India’s Request For Papers On Chopper Deal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेलिकॉप्टर घोटाळा: भारताकडे दस्तऐवज देण्यास इटलीचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/रोम- ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील कथित लाचप्रकरणी चौकशीत इटलीचे सहकार्य मिळण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. गोपनीयतेचे कारण पुढे करून दस्तऐवज भारताकडे सोपवण्यास इटालियन कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला. दरम्यान, सीबीआय आणि संरक्षण मंत्रालयाचे एक संयुक्त पथक रविवारी इटलीला रवाना होत आहे.

भारतीय वकिलातीने दस्तऐवज इटली सरकारला मागितले. सीबीआय तपासासाठी ते महत्त्वाचे ठरतील. इटलीत प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश बुस्टो आर्सिजियो लुका यांनी म्हटले की, भारताची विनंती स्वीकारणे शक्य नाही. तपास प्राथमिक टप्प्यातच आहे. यातील अनेक दस्तऐवज गोपनीय आहेत. आरोपी व त्यांच्या वकिलांनाच ते दिले जाऊ शकतात. गोपनीयतेची अट शिथिल होईल तेव्हा यावर विचार होऊ शकेल.


दरम्यान, इटलीला जाणा-या पथकात महासंचालक दर्जाचे 2 अधिकारी, कायदेविषयक सल्लागाराचा समावेश आहे. संयुक्त सचिव अरुणकुमार बल पथकात आहेत.

स्पष्टीकरण देण्याची तयारी
ऑगस्टा वेस्टलँड कंपनी भारताला स्पष्टीकरण देण्याची तयारी करत आहे. संरक्षण मंत्रालयाने यासंबंधी कंपनीला नोटीस पाठवून हा करार रद्द का केला जाऊ नये, अशी विचारणा केली होती.

ओरसींनीही आरोप नाकारले
फिनमेकॅनिका कंपनीचे माजी सीईओ जियुसेप्पे ओरसी यांनी हेलिकॉप्टर करारात बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप
नाकारला आहे. ओरसी सोमवारपासून अटकेत असून भारताचे माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाशी आपला परिचय नसल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले.

बड्या नेत्याशिवाय घोटाळा अशक्य
एवढा मोठा घोटाळा बड्या नेत्यांच्या सहभागाशिवाय शक्यच नाही, असे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. यात कोणा नेत्यांचा हात आहे हे देश जाणतो. कॅगशिवाय इतर तपास संस्थाही या प्रकरणी चौकशी करू इच्छित असल्या तरी केंद्र सरकारने त्यांना अटकाव केला असल्याचे जावडेकर म्हणाले.

ऑगस्टाशी चर्चा नाही : दिल्ली पोलिस
ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने दिल्ली पोलिसांशीही चर्चा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हा करार यशस्वी व्हावा म्हणून पोलिसांच्या मध्यस्थीने आणखी एका कंपनीला कमिशन देण्याचा प्रस्ताव ऑगस्टाने दिला होता, असे आरोप पोलिसांवर होत आहेत. हे आरोप पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी फेटाळले.

राजकारण करू नका
या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहन परराष्‍ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी केले. सध्या ते बांगलादेशात आहेत.