आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिकांच्या उत्साहामुळे सर्वच कार्यक्रम हाऊसफुल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - शनिवारच्या सुटीमुळे आज जयपूर लिटररी फेस्टिवलच्या दुस-या दिवशी सर्वच कार्यक्रमांना रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभला. वैचारिक स्वरूपाच्या प्रत्येक चर्चासत्रालाही किमान हजार लोकांची उपस्थिती होती, मग गुलजार यांच्या दोन्ही कार्यक्रमांच्या ठिकाणी तर त्यांच्याच कवितेतल्या मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती, हे बरोबरच म्हणायचे. एकूण साडेबारा हजार लोकांची पावले आज जेएलएफकडे वळली होती.
‘लव्ह स्टोरीज’ या कार्यक्रमादरम्यान जेएलएफच्या संचालक नमिता गोखले यांनी गीतकार प्रसून जोशी, भूतानमधील भारताचे उच्चायुक्त पवन वर्मा आणि गुलजार यांना बोलते केले. तुमचे पहिले प्रेम कोणते यावर गुलजार यांनी दिलेले उत्तर सर्वच प्रेमीजनांसाठी आश्वासक होते. मी पहिले प्रेम अनेकदा केले आहे, असे त्यांनी सांगितल्यावर हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘घरातल्या एका छोट्या डबीवर तू छोट्या रोपाचं चित्र रेखाटलं होतंस, आज येऊन पाहा त्यावर फूल उमललंय,’ अशी त्यांनी पहिल्या प्रेमाची ग्वाही दिली.
कपिल सिब्बल यांनी काल कविता सादर केल्या होत्या आणि त्याला पे्रक्षकांची दादही मिळाली होती. आज मात्र सृजन, सेन्सॉरशिप व नकार या विषयावरील परिसंवादात त्यांना टीकेचेही ध्वनी व्हावे लागले. सिब्बल यांच्यासारख्या फुटकळ कवीला व्यासपीठावर कसे बोलावले जाते? असा सवाल एका प्रेक्षकाने या वेळी केला. कालही त्यांचा कार्यक्रम सुरू असताना, बाहेर लावलेल्या पडद्यावर सिब्बल दिसल्यावर नवीनच आलेल्या एका तरुणीने ओह गॉड, धीस इज कपिल सिब्बल, लेट्स गो समव्हेअर एल्स, असे म्हटल्याचे कानावर आलेच होते. सृजनाविषयीच्या परिसंवादात प्रसून जोशी यांनी मान्य केले की, चित्रपटकलेतील सृजन, कला मागे पडत चालली आहे. एखाद्या कलाकृतीचे शीर्षक भडक असते, पण त्यापलिकडे त्यात काहीच विचार नसतो. अमूक एक शब्द वापरायचा नाही, असे सांगण्यात् ा आले तर ती भावना वा तो विचार वेगळ्या शब्दांत कसा मांडता येईल, याचा विचार कलाकाराने केला पाहिजे आणि त्यात आजचा हिंदी चित्रपट कमी पडतो आहे, असे ते म्हणाले.
सलमान रश्दी यांचा विषय अर्थातच या परिसंवादात निघाला. त्यावर रश्दी किती जणांनी वाचले आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला. जे लोक त्याला विरोध करतात, त्याच्यावर बंदीची मागणी करतात, त्यांनी रश्दी वाचलेला असतो का? या तेहमिना आनम यांच्या प्रश्नावर सूत्रधार शोमा चौधरी म्हणाल्या की जे त्याला पाठिंबा देत आहेत, त्यांच्यापैकी तरी किती तरी जणांनी तो वाचलेला नाही, हेही तितकेच खरे आहे.
गांधी, आंबेडकर अँड क्रॉसरोड्स अ‍ॅट जंतरमंतर हा परिसंवादही अतिशय रंगला. काहीसे गांधी विरुद्ध आंबेडकर असे स्वरूप त्याला आले असले तरी त्यातून जंतरमंतरवरच्या उपोषणाला संदर्भ नक्की जोडता आला. अण्णा हजारे यांना दुसरे गांधी म्हणावे का व ते गांधींच्या मार्गाने चालत आहेत का, याबाबत सर्वच वक्त्यांनी साशंकता व्यक्त केली. भ्रष्टाचार हा विरोध करण्यास सर्वात सोपा आहे, घरीदारी बाजारी सर्वच ठिकाणी भ्रष्टाचाराबाबत चर्चा करायला भारतीयांना अतिशय आवडते, त्यामुळे जंतरमंतरच्या उपोषणास एवढा प्रतिसाद लाभला, असे सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय म्हणाल्या. या परिसंवादात एम.जे. अकबर, सुनील खिलनानी व प्रकाशक एस. आनंद सहभागी झाले होते.
संजना कपूर खुश
नाट्यकर्मी संजना कपूर यंदा प्रथमच जेएलएफला आली होती. इकडची ओसंडून वाहणारी गर्दी, उत्साह, झगमगाट पाहून ती अतिशय आनंदली होती. जे कोणी येतात, ते नक्कीच इकडून काही ना काही मनात, डोक्यात घेऊनच जाणार याची तिला खात्री होती. नाटकांना असे ग्लॅमर, एवढी व्याप्ती कशी मिळेल, असेही तिला वाटून गेले.