आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर लिटररी फेस्टिव्हल : सिब्बल, गुलजार यांच्या कवितांना दाद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - ‘माझं आयुष्य मॅनेज करायला
मला आता माझा देव जवळ हवाय,
असा देव जो माझा समकालीन आहे,’
कवी कपिल सिब्बल यांनी त्यांची कविता संपवली आणि रसिकांनी टाळ्यांचा गजर केला. होय, तेच कपिल सिब्बल ज्यांनी गेल्या वर्षी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून अनेक राजकीय वादळांना तोंड दिले होते. जयपूर लिटररी फेस्टिव्हल (जेएलएफ)च्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ‘राजकारण आणि काव्यातील सत्य’ या विषयावरील सत्रात सिब्बल यांनी सादर केलेल्या कवितांना उपस्थित तरुण व मध्यमवयीन रसिकांची चांगलीच दाद मिळाली.
26 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी लिहिले होते, ‘त्यांची (बळी पडलेल्यांची) आयुष्ये व्यर्थ गेली नाहीत आणि आमची पूर्ण बदलून गेली आहेत.’ तर एका दहशतवाद्याला उद्देशून ते म्हणतात, ‘तुझ्यासारखंच मलाही जाळ्यात अडकल्यासारखं झालंय... तू माझ्यावर निशाणा साधतोयस, पण तू तर आंधळा आहेस.’
हिंदी कवी अशोक चक्रधर यांनी सिब्बल यांच्या भावनेचा असा अनुवाद केला ‘आओ बच्चो दौड के आओ, मेरे अंदर झूला है, ऐसा उंचा झुला दूँगा, तारे तोड सकेंगे तुम.’
काव्यवाचनानंतर उपस्थितांपैकी अनेकांनी सिब्बल यांना अण्णा हजारे यांच्याविषयी प्रश्न विचारण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु आयोजकांनी या विषयावर दोनच प्रश्नांना संमती दिली. एका महाविद्यालयीन तरुणीने विचारले की तुम्ही अण्णा हजारे यांच्याशी शांततेने का वागू शकत नाही. त्यावर ते म्हणाले, शांततेसाठी संवाद लागतो. घरात आईने तुमच्याशी बोलणे टाकले आणि जाहीर केले तुम्ही भ्रष्ट आहात तर.. अन्य एका व्यक्तीने त्यांनी या विषयावर एखादी कविता केली आहे का, अशी विचारणा केली.
याआधी सकाळच्या सत्रात कवी गुलजार यांना ऐकण्यासाठी मुघल शामियान्यात तुफान गर्दी लोटली होती. गुलजार यांनी हिंदीत तर पवन वर्मा यांनी त्यांच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद या वेळी सादर केले. गुलजार यांची न्यूयॉर्कवरची कविता सर्वांना अतिशय आवडून गेली. ‘मित्रा, तुझ्या शहरात मला मुंग्या नाही दिसल्या रे कुठे. साखरेचे कण जमिनीवर टाकून पाहिले तरी नाही आल्या त्या.. . अनेक पक्षी पाहिले तुझ्या शहरात पण भुंगा नाही दिसला रे कुठे... ’
जेएलएफमध्ये एकाच वेळी पाच कार्यक्रम सुरू असतात. नक्की कुठे जायचे, आपल्यालाही कळत नाही. जावेसे वाटते तिथे बसायला तर जागा मिळत नाहीच, पडद्यावरचे दिसेल अशी उभे राहायलाही मिळत नाही. परंतु सगळीकडे उत्साह, थंडीमुळे उबदार कपड्यांमध्ये फिरणारे भारतीय आणि त्यांच्या निम्म्याने तरी असलेले परदेशी रसिक, वाफाळत्या कॉफीचा वास, गरम समोसे, कुल्लडमधल्या पुष्करी चहाचा आस्वाद असा माहोल पुढचे चार दिवस असणार आहे.

डिग्गी पॅलेस या हॉटेलच्या परिसरात हा साहित्याचा उत्सव होत आहे. तिथे मुघल शामियाना, दरबार हॉल, फ्रंट लॉन्स, संवाद आणि बैठक अशा पाच मांडवांमध्ये कार्यक्रम होत आहेत. प्रवेश सर्वांना मोफत असला तरी ओळखपत्राशिवाय आत जाता येत नाही. सुरक्षाही ब-यापैकी आहे, शेकडो स्वयंसेवक राबत आहेत.
हजारोंच्या संख्येने रसिक उपस्थित असूनही कुठेच बेशिस्त वा गोंधळ गडबड नाही. अगदी स्वच्छतागृहेदेखील खरोखरीच स्वच्छ आहेत.
सर्वांसाठी भोजनाची उत्तम सोय आहे. सकाळच्या जेवणात इतर पदार्थांसोबत राजस्थानातील विशेष पालक के गट्टे आणि पापड मंगौडी की सब्जी हे खास चविष्ट पदार्थ होते.
वाइन इज बॉटल्ड पोएट्री हे रॉबर्ट लुई स्टीव्हन्सनचे वाक्य मोठ्या अक्षरात लिहिले होते. अर्थात आपल्या नाशिकच्या सुला वाइनयार्डच्या स्टॉलच्या बाहेर. जेवणात अर्थातच वाइनची सोय सुलातर्फे करण्यात आली आहे.