आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलमाडी-क्रीडामंत्र्यांत ‘ऑलिम्पिक’ जुंपली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/नवी दिल्ली- क्रीडामंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची इच्छा नसतानाही राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी ऑलिम्पिकसाठी लंडनला जात आहेत. या दौ-यात आपल्याला क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आपली बदनामी करणारे क्रीडामंत्री अजय माकन यांचा पंतप्रधानांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी कलमाडींनी केली. तर, आरोपीने केलेल्या आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, असे माकन यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक फेडरेशनचे सदस्य आणि आशियाई अ‍ॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने आपण ऑलिम्पिकला जात
असल्याचे कलमाडी म्हणाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान झालेल्या आर्थिक घोटाळ्यात एक वर्ष तुरुंगात काढलेले कलमाडी यांनी हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून जोवर कोर्टात मी दोषी ठरत नाहीत तोवर निर्दोषच आहे, असा दावा केला. क्रीडा संघटनांमध्ये माकन विनाकारण हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करून लंडनला जाणा-या पथकात आपल्याला स्थान मिळू नये म्हणून माकन प्रयत्नशील असल्याचे कलमाडी म्हणाले.
कलमाडींमुळे प्रोत्साहन : प्रशिक्षकाचा दावा- कलमाडी लंडनला आले तर अ‍ॅथलेटिक्सना प्रोत्साहन मिळेल, असे प्रशिक्षक बहादूरसिंग यांनी म्हटले आहे. गेल्या 15-20 वर्षांपासून कलमाडी अ‍ॅथलेटिक्स क्षेत्राशी जोडलेले आहेत. जोवर कोर्ट त्यांना दोषी ठरवत नाही तोपर्यंत ते निर्दोषच आहेत, असे सिंग म्हणाले.
क्रीडापटूंची टीका- अ‍ॅथलेटिक्स संघटना वगळता देशपातळीवर मात्र विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी कलमाडी यांच्या लंडन वारीवर टीका केली आहे. राष्ट्रकुलसारख्या घोटाळ्यात वर्षभर तुरुंगवास भोगलेली व्यक्ती भारतीय प्रतिनिधी मंडळात असू नये, असे मत या खेळाडूंनी मांडले आहे.
कलमाडींची नाराजी कशामुळे?- सीबीआय कोर्टाने शुक्रवारी कलमाडी यांना ऑलिम्पिकसाठी लंडनला जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि क्रीडा मंत्रालयाने कलमाडी यांनी ऑलिम्पिकपासून दूर राहावे, असे आवाहन केले होते. क्रीडामंत्री अजय माकन यांचाही कलमाडींना विरोध आहे. संघटनेच्या वतीने कलमाडी लंडनला येणार नाहीत, असे आयओएने म्हटले होते. कलमाडी आयओएच्या शिष्टमंडळात असणार नाहीत यासाठी प्रयत्न करेन, असे सांगून माकन यांनी वादात तेल ओतले.
मी लंडनला जाणारच - कलमाडी