आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरींना अणुयुद्धासाठी सज्जतेचा इशारा, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मिर - भारतीय लष्कराकडून काश्मिरच्या जनतेला संभाव्य अणुयुद्धाला तयार राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे वृत्त आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये सध्या चर्चेत आहे. अमेरिका, ब्रिटन, पाकिस्तानसह अनेक देशांच्या न्यूज वेबसाईटवर या वृत्ताला प्रामुख्याने स्थान देण्यात आले आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरही त्यावर वाद-विवाद सुरु झाले आहेत.

या खळबळ माजवणा-या वृत्तात, भारतीय सैन्याने काश्मिरींना संभाव्य अणुयद्धासाठी सज्ज राहाण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यात म्हटले आहे की, नागरिकांनी महिनाभराच्या अन्न-धान्यासह गरजेच्या वस्तूंची जमवाजमव करुन ठेवावी. येथील पोलिसांच्या माध्यमातून हे वृत्त इंग्रजी आणि उर्दू वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाने या वृत्ताला सैन्याचा इशारा म्हटले आहे तर, काहींनी सुचना म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर या वृत्ताची दखल घेतली गेल्यानंतर आता स्थानिक अधिकारी म्हणत आहेत की, 'हे 'नियमीत वृत्त' आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे यासाठीचा हा इशारा आहे. याचा अर्थ खरोखर अणुयुद्ध होणार आहे असा होत नाही.' भारत-पाकिस्तानमध्ये याआधीही युद्ध झाले आहेत, हे सांगण्यासही ते विसरले नाही.

स्थानिक अधिकारी या वृत्ताबद्दल कितीही तर्क मांडत असले तरी, स्थानिक नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कारण हे वृत्त अशा पार्श्वभूमीवर आले की, भारताच्या दोन सैनिकांचे शिर धडावेगळे केल्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण आहे.

सोमवारी हे वृत्त येथील 'ग्रेटर काश्मिर' वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. त्यात नागरिकांना सुचना देण्यात आली की, त्यांनी घरातच बंकर तयार करावेत. तसेच तिथे राहाण्यासाठी महिनाभराच्या सामानाचाही बंदोबस्त करावा.