आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केशुभाई पटेल स्थापणार नवा पक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजपचे असंतुष्ट नेते केशुभाई पटेल नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वाला कंटाळून नवा पक्ष स्थापन्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यावर्षीची गुजरात विधानसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप, कॉँग्रेस आणि केशुभार्इंचा पक्ष रिंगणात उरणार आहे.
नव्या पक्षाची घोषणा या महिनाअखेर होण्याची शक्यता आहे. केशुभाई नवा पक्ष स्थापणार ही गोष्ट 100 टक्के खरी आहे. आम्ही विधानसभेच्या सर्व 182 जागा लढवणार आहोत. पक्ष नेतृत्व अर्थातच केशुभाई यांच्याकडे असेल. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत होईल, असे केशुभार्इंचे समर्थक गोवर्धन झादाफिया यांनी सांगितले. झादाफिया मोदी सरकारमध्ये मंत्री होते.
गुजरातमध्ये 1995 पासून भाजप सत्तेवर आहे. गेल्या दोन दशकात देशात प्रादेशिक पक्षांचा विस्तार झाला, मात्र गुजराती जनतेने त्याला थारा दिला नाही. माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी 1980 च्या दशकात जनता मोर्चाची स्थापना केली होती. त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने चिमणभाई पुन्हा स्वगृही कॉँग्रेसमध्ये परतले होते. माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला भाजपमधून बाहेर पडत 1996 मध्ये राष्टीय जनता पार्टीची स्थापना केली.
विधानसभा निवडणुकीत केवळ चार जागा मिळाल्याने त्यांनी कॉँग्रेसमध्ये जाणे पसंत केले. मोरारजी देसाई यांनी स्थापन केलेल्या संस्था कॉँग्रेसला काहीसे यश मिळाले. आणीबाणीनंतर संस्था काँग्रेससह चार पक्षाच्या आघाडीला सरकार स्थापन करण्यात यश आले.
गुजराती जनतेने प्रादेशिक पक्षांना कधीही स्वीकारले नाही. गेल्या काही वर्षांत असेच प्रयोग झाले. त्यामुळे पटेल गटाला यश मिळणार नाही, असे नाव न छापण्याच्या अटीवर भाजप नेत्याने सांगितले. मात्र, झादाफिया यांनी या मताशी असहमती दर्शविली. भारतीय लोकशाहीत लोक विश्वासार्ह पर्यायाच्या शोधात असतात. त्यांना तो मिळल्यानंतर लोक पाठिंबा देतात, असे झादाफिया म्हणाले.
नवे गणित - मोदी-केशुभाई वाद अभ्यासक्रमातही