आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किरीट सोमय्यांचा मोर्चा आता राजस्थानाकडे; वसुंधरांच्या \'फिल्डिंग\'साठी गहलोतांवर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा उत्तरेकडील राज्यांत वळवला आहे. सोमय्या यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, त्यांचे संपूर्ण सरकारच भ्रष्ट असल्याचा हल्लाबोल केला.

केंद्र सरकारमधील तीन अतिविशिष्ट लोक हेलिकॉप्टर घोटाळ्यात सामील आहेत तर, आमेर येथील कूकस गावांत बांधण्यात येत असलेल्या हॉटेलबाबत गहलोतांनी का चुप्पी साधली आहे, असा सवाल करीत काँग्रेस पक्ष व मुख्यमंत्री गहलोत यांच्यावर आरोप केले. याचबरोबर जयपूरमधील राजस्थान सरकारच्या 108 एब्युलन्सद्वारे सेवा पुरवणा-या कंपनीने केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली.

राजस्थानमध्ये या वर्षाअखेर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. त्याचाच भाग म्हणून नुकतेच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष वसुंधरा राजे शिंदे यांच्यावर भ्रटाचाराचे आरोप करीत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

कूकसमध्ये बांधण्यात येत असलेल्या हॉटेलचा मालक कोण आहे, हे राजस्थानमधील जनतेला सांगणे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असल्याचे सोमय्यांनी सांगितले. यावर गहलोत यांनी वसुंधरा यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता सोमय्या म्हणाले, राजे यांच्याविरोधात सरकारकडे एकही पुरावा नाही. यापुढे भाजप गहलोत सरकारने केलेले घोटाळे बाहेर काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींचा हनुमान वसुंधरा राजेंच्या मदतीला!- किरीट सोमय्या हे नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाकडे डोळे लावून बसले आहेत. सोमय्या हे जरी मुंबईत राहत असले तरी ते मूळचे गुजराती आहेत. त्यामुळेच ते मोदींचे कट्टर समर्थक आहेत. मोदींनी मागील काही दिवसात वसुंधरा राजे शिंदे यांच्याशी जवळीक वाढविली आहे. मोदींच्या शपथविधीला त्या आवर्जुन उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर मागील महिन्यात राजे आणि मोदी यांनी बंद दाराआड दिवसभर चर्चा केली होती. त्यानंतर राजनाथसिंग भाजपचे पक्षाध्यक्ष होताच मोदींच्या सांगण्यावरुनच राजस्थानमधील येत्या विधानसभेच्या निवडणुकीची सूत्रे राजेंच्या हाती देण्याचे जाहीर केले. वसुंधरा सध्या राजस्थानमध्ये पक्षाच्या अध्यक्षा असून, मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला त्यांचाही मोठा पाठिंबा आहे.

राजस्थानात या वर्षी निवडणुका लक्षात घेता राजस्थानमधील काँग्रेसचे गहलोत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन वसुंधरांसाठी पोषक वातावरण करण्याचा प्रयत्न आहे. वसुंधरांना मोदी पंतप्रधान व्हावेत असे वाटते. तर, राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी वसुंधरा राजे विराजमान व्हाव्यात, असे मोदींना वाटते. त्यामागे लोकसभेच्या जागेचे गणित असून राजस्थानमधून जास्तीत खासदार भाजपचे निवडून यावेत व ते मोदींच्या पाठिशी राहावेत यासाठीची ही व्यूहरचना आहे. त्याचाच भाग म्हणून मोदींसाठी हनुमानाची भूमिका पार पाडण्यासाठी व वसुंधरा राजेंसाठी किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता राजस्थानकडे वळविला आहे.

भुजबळांवरील आरोपांमागेही 'मोदी-राज' कनेक्शन- याआधी सोमय्यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना टार्गेट केले होते. विशेषत त्यांनी नाशिककर छगन भुजबळ यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामागेही 'मोदी-राज ठाकरे व नाशिकधील संभाव्य राजकारण व सत्तास्थान' असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिक पालिका राज ठाकरे यांच्या मनसेकडे आहे. तसेच मनसेचे तीन आमदार आहेत तर, नाशिकचे खासदारपद भुजबळांच्या घरात आहे.