आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुर्यनेल्‍ली बलात्‍कार प्रकरणी राज्‍यसभेचे उपसभापती कुरियन अडचणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - केरळमधील सूर्यनेल्ली अत्याचार प्रकरणी राज्यसभेचे उपसभापती पी.जे. कुरियन अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी धर्मराजन याने कुरियन या प्रकरणात सहभागी असल्याचे म्हटले आहे. 1996 मध्ये घडलेल्या या घटनेत 16 वर्षीय शाळकरी मुलीवर 40 जणांनी अत्याचार केला होता.

याप्रकरणी धर्मराजनला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर तो फरार झाला आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत धर्मराजन याने आपण स्वत: कुरियन यांना संबंधित मुलीला ठेवलेल्या कुमली गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेलो असल्याचे सांगितले. तत्कालीन चौकशी पथकाचे प्रमुख सी. बी. मॅथ्यूज यांनी कुरियन यांचे नाव न घेण्यासाठी त्या वेळी आपल्यावर दबाव आणल्याची माहिती धर्मराजन याने दिली. धर्मराजन याचा हा आरोप कुरियन तसेच मॅथ्यूज यांनी फेटाळून लावला आहे. धर्मराजन फक्त संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मॅथ्यूज यांनी म्हटले आहे तर दोषी ठरलेल्या व्यक्तीची ही बडबड निरर्थक असल्याचे सांगत धर्मराजनला याप्रकरणी आपले म्हणणे न्यायालयातच मांडायला हवे होते, असे कुरियन यांचे म्हणणे आहे. काँग्रेसने कुरियन यांच्या बचावाचा पवित्रा घेतला आहे. पक्षाचे प्रवक्ते संदीप दीक्षित यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयाने कुरियन यांना पूर्र्वीच निर्दोष ठरवले असल्याचे सांगतानाच, एखादा नवा मुद्दा न्यायालयासमोर आल्यास, पक्ष न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करेल असे म्हटले आहे.