आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लडाखचे रूपांतर धार्मिक पर्यटन स्थळात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेह- बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या लडाखमध्ये जम्मू-काश्मीर सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना तयार केली आहे. लडाखचे धार्मिक पर्यटन स्थळात रूपांतर करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे.
राज्याचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ही योजना तयार करण्यात आली आहे. योजनेसाठी पर्यटनतज्ज्ञांना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यात पायाभूत सुविधा पुरवण्यात येतील. अगोदर राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची निर्मिती करण्यात येईल.
आम्ही लडाखसंबंधीचा एका प्रकल्प अहवाल तयार केला असून तो सरकारकडे सोपवण्यात आला आहे. या अहवालात प्रकल्प विकासासाठी लागणारा खर्चदेखील नमूद करण्यात आला आहे, असे पर्यटनमंत्री नवांग रिग्जीन जोरा यांनी सांगितले. लडाखमध्ये दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
राज्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्य सरकारने पर्यटन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य शहरातच नव्हे, तर पर्यटकांना ज्या भागात जायला आवडते त्या ठिकाणी अशी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून पर्यटकांना मार्गदर्शन करण्यात येईल. खाणेपिणे, राहण्यापासून सर्व प्रकारची माहिती यातून मिळणार आहे, असे मंत्री जोरा यांनी सांगितले.
गेल्या वर्षी राज्याला 1 लाख 48 हजार 588 पर्यटकांनी भेट दिली होती. त्यातील 29 हजार 856 विदेशी पर्यटक होते. लडाखचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारचे वॉटर पार्क बांधण्यात येणार नाही. त्याचबरोबर कोणतेही उद्यानही तयार केले जाणार नाही.
लडाखमध्ये 35 बुद्धविहार आहेत. पर्यटकांच्या देणगीतून ती चालवली जातात. आता या विहारांचा विकास राज्य सरकारने करण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारकडून त्यांना आर्थिक मदत झाली
नाही तरी त्यांच्या पायाभूत विकासासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. संशोधन व संवर्धनासाठी सरकार मदत करेल. प्रकल्पासाठी काही वर्षे लागणार आहेत. मात्र केंद्र किती निधी देणार हे अद्याप निश्चित नाही.
150- कोटी रुपये एवढा पर्यटन विकास आराखड्यासाठी लागणारा खर्च.
50- कोटी रुपये धार्मिक पर्यटनामध्ये बौद्ध परिसर विकासासाठी लागणार.