आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकायुक्त नेमणूक: मोदी तोंडघशी, गुजरात सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमधील लोकायुक्त नेमणुकीच्या वादात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तोंडघशी पडले आहेत. राज्यपाल कमला बेनीवाल यांचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. लोकायुक्त आर.ए. मेहता यांच्यावरून तीन महिन्यांपूर्वीच न्यायालयाने वेगवेगळा निकाल दिला होता. मतभेदाच्या मुद्द्यांवरील सुनावणीनंतर बुधवारी न्यायमूर्ती व्ही.एम. सहाय यांच्या न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवला.
सरकार या निर्णयाचे स्वागत करत असून, आमच्या बाजूचे अनेक मुद्दे राहून गेले आहेत, असे सरकारचे प्रवक्ते जयनारायण व्यास यांनी म्हटले आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत असून, या निकालाला सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, असेही व्यास यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणात पक्षकार करण्यात आलेल्या मेहता यांनी मात्र बोलण्यास नकार दिला. वादामुळे त्यांनी आजवर पदाची सूत्रेही हाती घेतलेली नाहीत. आता ते कोणत्याही क्षणी कार्यालयात येऊ शकतात.

प्रकरण काय

गुजरातेत नोव्हेंबर 2003 पासून लोकायुक्तांचे पद रिक्त आहे. राज्यपाल बेनीवाल यांनी 25 ऑगस्ट 2011 रोजी निवृत्त न्यायमूर्ती मेहता यांना लोकायुक्त नेमले. गुजरात लोकायुक्त कायदा 1986च्या आधारे त्यांनी ही नेमणूक केली. 26 ऑगस्ट रोजी सरकारने आव्हान याचिका दाखल केली.

निर्णयाला आधार काय

न्यायमूर्ती सहाय यांनी आपल्या 80 पानी निकालपत्रात न्यायमूर्ती अकील कुरेशी यांचा निर्णय योग्य ठरवतानाच न्यायमूर्ती सोनियाबेन गोकानी यांच्याशी असहमती दर्शवली आहे. शिवाय राज्य सरकारची याचिकाही फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती म्हणाले...
असामान्य स्थिती पाहता न्यायमूर्ती आर.ए. मेहता यांना लोकायुक्त म्हणून नेमण्याचा निर्णय योग्य आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना घटनेच्या 163 व्या परिशिष्टातील अधिकारांचा वापर करण्यास भाग पाडले.
परिस्थिती असामान्य होती, त्यामुळे राज्यपालांचा निर्णयदेखील असामान्य होता.
मुख्य न्यायमूर्ती - मुख्यमंत्री विचारविनिमय प्रक्रिया पूर्ण झाली.

मोदींचा युक्तिवाद
नेमणुकीआधी राज्यपालांनी राज्य सरकारशी सल्लामसलत केली नाही.
राजभवनाने सरकारकडे कानाडोळा करत एकतर्फी निर्णय घेतला. तो घटनाबाह्य आहे.
हा निर्णय देशाच्या संघराज्य पद्धतीच्या विरोधात आहे.