आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद मदनलाल धिंग्रांचे वडिलोपार्जित घर पाडले

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध संघर्ष करून प्राणार्पण करणा-या शहीद मदनलाल धिंग्रा यांचे अमृतसर येथील घर त्यांच्या भावाने विकले असून, नव्या घरमालकाने या घराचा काही भाग पाडूनही टाकला आहे. देशभक्तीची प्रेरणा देणा-या या घराचे रूपांतर शहीद स्मारकात करण्याची मागणी करणा-या जनहित याचिकेवर पंजाब व हरियाणा हायकोर्टाने पंजाब सरकार व अमृतसरच्या जिल्हाधिका-यास नोटीस जारी केली आहे.
वकिली व्यवसाय करणा-या एच. सी. अरोरा यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, मदनलाल धिंग्रा यांचे वडिलोपार्जित घर अमृतसरमधील कटरा शेरसिंह येथे आहे. हे घर त्यांच्या भावाने भाड्याने दिले होते. मागील 60 वर्षांपासून या घरात राहणारा भाडेकरू घर सोडत नसल्यामुळे मदनलाल यांच्या भावाने हे घर तिस-याच एका व्यक्तीला विकले.
नव्या मालकाने भाडेकरूला हुसकावून लावले आणि नव्याने बांधकाम करण्यासाठी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या घराचा काही भाग पाडूनही टाकला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अमृतसरमध्ये निदर्शनेही केली. याचिकेत पुढे म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि प्राणत्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा पराक्रम नव्या पिढीला माहीत होण्यासाठी सरकारने या जमिनीचे अधिग्रहण करून येथे राष्ट्रीय स्मारक तयार करावे. या याचिकेवर प्राथमिक सुनावणीनंतर हायकोर्टाने नोटीस जारी केली आहे.
येथे झाला मदनलाल धिंग्रांचा जन्म - कटरा शेरसिंह येथील हवेलीत मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 रोजी झाला होता. त्यांनी 1 जुलै 1909 रोजी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करून लंडन येथील जहांगीर हॉलमध्ये कर्झन वायलीची गोळी झाडून हत्या केली होती. 17 ऑगस्ट 1909 रोजी इंग्रज सरकारने त्यांना फासावर चढवले. धिंग्रांनी पुकारलेल्या या बंडामुळेच जालियनवाला बागेतून लढ्याची ज्वाळा भडकली. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सरकारनेही त्यांची उपेक्षाच केली, असे सांगितले जाते. मोठ्या मुश्किलीने 20 डिसेंबर 1976 रोजी त्यांच्या अस्थी अमृतसर येथे आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले व तेथे स्मारक म्हणून एक पुतळा उभारण्यात आला.