आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahakubhamela : Made Within Four Month,remove Within One And Half Month

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाकुंभमेळा : चार महिन्यांत वसवले, काढण्यासाठी दीड महिना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद- दिल्ली ते भोपाळ अंतराएवढ्या विजेच्या तारा, सव्वा लाख कनेक्शन्स, जयपूर ते दिल्ली अंतराएवढ्या लांबीचे रस्ते, अलाहाबाद ते दिल्लीएवढ्या अंतराची पाण्याची पाइपलाइन, 25 हजार स्वच्छतागृहे, कोट्यवधी लोकांसाठी हा सगळा जामानिमा 55 दिवसांच्या महाकुंभमेळ्यासाठी आहे. संगमावर खास जिल्ह्याचा दर्जा देण्यात आलेल्या नव्या शहराला आकार देण्याच्या व्यवस्थापनाचाही एक अद्भुत नमुना आहे. जगभरातील दोन हजार मीडिया प्रतिनिधी 24 तास लाइव्ह रिपोर्टिंग करत असताना तर हे काम अत्यंत जोखमीचे आहे.

सुमारे 63 चौरस कि.मी. पसरलेल्या अलाहाबादची लोकसंख्या आहे 12.5 लाख.
संगमावरील 25 चौरस कि.मी.च्या विस्तीर्ण वाळवंटात चार महिने चोवीस तास खपून तंबूंचे एक शानदार शहर उभारले गेले. या ठिकाणी सामान्य दिवशी सुमारे 40 लाख, तर मौनी अमावास्येच्या दिवशी 3 कोटी भाविक जमले होते. भव्यदिव्य इंटियरसह तात्पुरत्या स्वरूपाचे सरकारी कार्यालय, अधिका-यांची दालने, कॉन्फरन्स रूम, कंट्रोल रूम, मिटिंग हॉल ही सगळी सजावट करण्यात आली ती बांबू, प्लायवूड आणि पत्र्याच्या शेड्समधून. सरकारी कार्यालयांत चमकणारे साइनबोर्डस लटकले. 75 जिल्हे असलेल्या उत्तर प्रदेशातील प्रत्येक कानाकोप-या तून सामुग्री गोळा करण्यात आली. याशिवाय दिल्ली, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या मंडप डेकोरेटर्सचीही चांदी झाली.


सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत 2200 हेक्टर जमीन चार हजार संस्थांना देण्यात आली. या ठिकाणी रस्ते, पाणी, पूल, वाहतूक, वीज, अन्नधान्य आणि साफसफाईची चोख व्यवस्था करण्यात आली. या कामी डिसेंबरमध्ये सर्वाधिक 20 हजार कर्मचारी गुंतलेले होते. संस्थांची पत्रे, छत आणि तंबू धनाढ्य भाविकांनी दिलेले होते. हे स्थळ वसविण्यासाठी चार महिने लागले, आता ते उठवण्यासाठी दीड महिना लागेल, असे कुंभमेळ्याचे अधिकारी शुभ्रांत कुमार शुक्ला यांनी सांगितले.

नव्या अधिका-यांसाठी प्रयोगशाळा
नव्या अधिका-यांसाठी कुंभमेळा ही प्रयोगशाळा आहे. 2011च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवरंजन यांच्यासह 14 अधिका-यांचे पथक या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहे. पोलिस खात्याच्या प्रत्येक जवानासाठी सूचना असलेल्या अडीचशे पानी पुस्तिकेतील गाइडलाइन वाचून हे अधिकारी व्यवस्थेची पाहणी करत आहेत. यात कुंभमध्ये स्वत: स्वयंपाक करायचा नाही आणि बाहेरचेही खायचे नाही. केवळ सरकारी लंच पॅकेटवरच निर्भर राहायचे. कोट्यवधी लोकांच्या रक्षणासाठी आपली प्रकृती ठणठणीत राहायला हवी, अशा सूचना यात देण्यात आलेल्या आहेत.

दृष्टिक्षेपात कुंभमेळा
55 दिवसांचा कुंभमेळा
600 कि.मी. पाइपलाइन
750 कि.मी. लांबीची विजेची लाइन
200 कि.मी. लांबीचे रस्ते
15 रुग्णालये, 30 पोलिस ठाणी
10 हजार सफाई कामगार
15 हजार पोलिस कर्मचारी
1410 कोटी रुपये खर्च
शिकता येईल असे
खूप काही

बहुतेक निर्णय अचानक होतात. सगळे काही पूर्वनियोजित करता येत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवे घडते. गर्दी वाढण्याची सूचना मिळताच सुरक्षा व्यवस्थेत अचानक बदल होतो. नवे काही शिकण्यासाठी कुंभमेळा हा सर्वात मोठा प्लॅटफार्म आहे. - देव रंजन, ट्रेनी आयपीएस.
चहुबाजूंनी आव्हानेच
* रोज लाखो भाविक येतात. अचानक वाढणा-या गर्दीचा ताण.
* 750 विशेष रेल्वे, 6 हजार बसगाड्याही अपु-या पडत आहेत.
* रस्त्यावरील गर्दी नियंत्रणाचे आव्हान.
* आयोजन धार्मिक, तरी गुन्हेगारी आहेच. त्यामुळे 30 पोलिस ठाण्यांची गरज भासली.
* दररोज दाखल होणारी प्रकरणे नगण्य आहेत. मौनी अमावास्येपर्यंत 80 एफआयआर दाखल.
* खटले निकाली काढण्यासाठी 14 सेक्टर मॅजिस्ट्रेटही दिव्यांच्या गाड्यांसह तैनात. कुंभ मार्चमध्ये पार पडेल. प्रलंबित प्रकरणे अलाहाबादच्या दारागंज ठाण्यात वर्ग होतील.