आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती निवडणुक : ममता बॅनर्जींनी धुडकावले सोनियांचे भोजनाचे निमंत्रण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेले प्रीतीभोजनाचे निमंत्रण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धुडकावून लावले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीआधी म्हणजेच 18 जुलै रोजी सोनिया गांधींनी संपुआच्या सर्व सदस्यांसाठी प्रीतीभोजनाचे आयोजन केले आहे. सोनियाचे निमंत्रण नाकारण्याची ममतांची ही दुसरी वेळ आहे.
काँग्रेसचे नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी प्रीतीभोजनाचे निमंत्रण देण्यासाठी फोन केला. मात्र, 21 जुलै रोजी आपली मोठी सभा असल्याने आपणास कोलकातामध्येच राहावे लागणार असल्याचे सांगून ममता बॅनर्जी यांनी हे निमंत्रण नाकारले. गेल्या महिन्यात संपुआने माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिल्यापासून ममतांचा संपुआशी दुरावा वाढला आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या नादाला लागून ममतांनी राष्ट्रपतिपदासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव सूचवले होते. मात्र, यादवांनी मुखर्जींना मतदान करण्यासाठी काँग्रेसबरोबर गुप्त करार केला आणि आघाडीत ममता एकट्या पडल्या. महत्त्वाच्या धोरणात्मक मुद्दय़ावर ममतापुढे झुकणार्‍या संपुआनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष सुरू केले.
उमेदवारी घोषित झाल्यानंतर स्वत: मुखर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांना आपणास मतदान करायला सांगा, असे आवाहन ममतांना केले होते. मात्र, निवडणुकीपूर्वी तीन दिवस आधी म्हणजेच सोमवारी आपण आपली भूमिका निश्चित करू, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.दरम्यान, रविवारी दुपारी संपुआच्या घटक पक्षाची बैठक होत असून या बैठकीत राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. पक्षाचा प्रतिनिधी म्हणून रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांना या बैठकीला पाठवण्यास ममता राजी झाल्या आहेत. याच बैठकीत अन्सारी हे पुन्हा उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घटक पक्षांना मान्य आहेत काय, याची चाचपणीही काँग्रेस करणार आहे.
गौडबंगाली ममता
राष्ट्रपती निवडणूक - प्रणवदांना ममता पाठिंबा देतील - शरद पवार
ममता पाठिंबा देतील अन् प्रणवदांच राष्ट्रपती होतील; शरद पवारांना विश्वास