आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोग काँग्रेसच्या दबावाखाली - मायावती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ: निवडणूक आयोग काँग्रेसच्या दबावाखाली काम करत असल्याचा सनसनाटी आरोप उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री व बसपाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी केला. आपले पुतळे व बसपाचे निवडणूक चिन्ह हत्तींची झाकपाक करण्याचा आयोगाचा निर्णय मायावतींनी दलितविरोधी आणि जातीयवादी ठरवला.
घटनात्मक जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे निभावत आयोगाने काँग्रेसचे चिन्ह ‘पंजा’ आणि रालोदचे चिन्ह ‘हँडपंप’देखील झाकायला हवे. आयोगाने या दोन्ही पक्षांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास जनता आयोगाला दलितविरोधी आणि जातीयवादी ठरवील. काँग्रेसच्या दबावाखाली केलेली कारवाई समजली जाईल.
कांशीराम यांची इच्छा म्हणून स्वत:चे आणि हत्तींचे पुतळे उभारले होते. ते झाकून आयोगाने एकतर्फी निर्णय घेतला. आमच्या पक्षाचे ऐकलेही नाही. भारतीय संस्कृती म्हणून हत्तींचे पुतळे उभारले होते, असे त्या म्हणाल्या. विरोधी पक्षांच्या तक्रारींवरून आयोगाने दलित समाजाच्या दोन अधिका-यांची हकालपट्टी केल्याचा आरोपही मायावती यांनी केला.
दलित, मुस्लिम, ब्राह्मणांना तिकिटे
निवडणूक आयोगाला जातीयवादी ठरवणा-या मायावतींनी उमेदवारी देताना मात्र जातीपातीची समीकरणे जपली आहेत. गेल्या निवडणुकीच्या वेळचे सोशल इंजिनिअरिंग कायम ठेवत बसपाने दलितांना 88, मागासांना 113, मुस्लिमांना 85, सवर्णांना 117 तिकिटे दिली आहेत. 74 ब्राह्मण आणि 33 क्षत्रियांनाही तिकीट देण्यात आले आहे. वैश्य, कायस्थ आणि पंजाबी लोकांनाही उमेदवारी मिळाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबात पक्ष स्वबळावर सर्व जागा लढवत असल्याचे मायावतींनी म्हटले आहे.
स्वच्छ प्रतिमा, पक्षनिष्ठेचा निकष
तिकीटवाटपात या वेळी स्वच्छ प्रतिमा आणि पक्षावरील निष्ठा हे निकष जपण्यात आले आहेत. मागील निवडणुकीत पक्षाच्या लोकांना अंधारात ठेवून अनेक लोकांनी आमच्या पक्षाची तिकिटे मिळवली होती. निवडून आल्यानंतर त्यांनी गैरप्रकार करत पक्ष आणि सरकारची प्रतिमा मलिन केली होती, असेही मायावती यांनी म्हटले आहे.
बहुमताचे बर्थडे गिफ्ट द्या
मायावती यांचा 56 वा वाढदिवस साधेपणाने साजरा झाला. भलेमोठे केक कापले गेले नाहीत की राज्यस्तरावर भव्य कार्यक्रमही झाला नाही. आतापर्यंत या दिवशी मायावती मोठ्या प्रकल्पांची घोषणा करतात. आचारसंहिता लागू असल्याने यंदा तेदेखील झाले नाही. पक्ष कार्यकर्ते आणि शुभचिंतकांना आपला वाढदिवस कुटुंबातच साजरा करण्याचे मायावतींनी सांगितले. बर्थडे गिफ्ट म्हणून बहुमताचा नजराणा द्या, अशी मागणी त्यांनी केली.
दुस-या टप्प्यासाठी आज अधिसूचना
उत्तर प्रदेशात दुस-या टप्प्यात 11 फेब्रुवारी रोजी होणा-या मतदानासाठी राज्यपाल बी.एल. जोशी सोमवारी अधिसूचना जारी करतील. यात 59 जागांसाठी मतदान होईल. 8 फेब्रुवारीला पहिला टप्पा होईल. 23 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 27 पर्यंत ते मागे घेता येतील.

मायावती व हत्तींचे पुतळे झाकणार, निवडणूक आयोगाचे आदेश
उत्तर प्रदेश विभाजनाचा प्रस्‍ताव फेटाळल्‍यामुळे मायावती नाराज
शबाना आझमी यांचा 'मायावती' लूक कसा वाटतो?