आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफझल गुरूचा मीडियाला पुळका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाच्या संसदेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफझल गुरूला फासावर लटकवल्यामुळे फुटीरतावाद्यांबरोबरच मीडियाचाही तिळपापड होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अफझल गुरूला फाशी देण्यास घाई का केली? त्याच्या कुटुंबीयांना टपालानेच का कळवले? त्याच्या कुटुंबीयांना अंधारात का ठेवले? अशा प्रश्नांची सरबत्ती करत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मीडियाने सोमवारी अक्षरश: धारेवर धरले.

अफझलला फाशी देण्याचा निर्णय राजकीय नव्हता. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करूनच त्याला फासावर लटकवण्यात आले. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री बिआंत सिंग यांच्या खुन्यांचे आणि अफझल गुरूचे प्रकरण वेगळे आहे, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले. या दोघांच्याही मारेक-यांना वेगळा पर्याय देऊन अफझललाच फासावर लटकवण्याची घाई का केली, असे त्यांना विचारण्यात आले, त्या वेळी त्यांनी हा खुलासा केला. अफझलच्या कुटुंबीयांना कळवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप फेटाळून लावताना शिंदेंनी पत्रकार परिषदेत स्पीड पोस्टाच्या पावतीच्या झेरॉक्स प्रतीच दाखवल्या. सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी दहा मिनिटांच्या अंतराने दोन स्पीड पोस्ट पाठवण्यात आले होते, असे शिंदे म्हणाले. दरम्यान, तिहार तुरुंगाच्या प्रशासनाने फाशीची सूचना देणारे पाठवलेले पत्र अफझल गुरूला फासावर लटकवल्याच्या 52 तासांनंतर मिळाले.

तिहार तुरुंगातील अफझलच्या थडग्याला भेट देण्याच्या त्याच्या कुटुंबीयांच्या मागणीवर सरकार विचार करेल, असे शिंदे म्हणाले. अफझलच्या कुटुंबीयांनी त्याच्या कबरीजवळ फतियाह नमाज अदा करण्याची परवानगी मागितली आहे.