आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांची भेट घेतली. हे नेते सुमारे अडीच तास एकत्र होते. त्यामुळे राजकीय गोटात मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीविषयी पुन्हा चर्चा झडली आहे. मात्र, पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा करून आपण सिंह यांना शुभेच्छा दिल्याचे मोदी यांनी नंतर सांगितले.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून सध्या भाजपमध्ये प्रचंड मंथन सुरू आहे. गुजरातमध्ये सलग तिस-यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोदींची पंतप्रधानपदाची दावेदारी अधिक पक्की समजली जात आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीविषयी चर्चा सुरू असतानाच राजनाथसिंह यांची मोदींनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. या भेटीविषयी भाजप गोटातही अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आगामी निवडणुकीत मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करता त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे मानले जाते. यातून वेगळा संदेश मतदारांपर्यंत जाऊ शकेल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे.
ही सदिच्छा भेट...
अध्यक्षपदी निवड झाल्यावर मोदींचा फोन आला होता. तेव्हा दिल्लीत येऊनच शुभेच्छा देईन, असे बोलणे झाले. त्यानुसार ते दिल्लीत आले होते.’
राजनाथसिंह, भाजपाध्यक्ष
निवडणुकीवर विचारमंथन
या भेटीत विविध विषयांवर दीर्घ चर्चा झाली. 2014 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीवरही विस्ताराने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.’
नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, गुजरात
सिंह यांचा अनुभव मोलाचा
सिंह अनुभवी नेते आहेत. त्यांचा अनुभव पक्षाला फायद्याचा ठरेल, असे मोदींनी सांगितले. दिल्लीला रवाना होण्याआधी मोदींनी ट्विट केले की, ‘दिल्लीला जात आहे. सिंह यांची भेट घेऊन भाजपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देईन...’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.