आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पावसाळी अधिवेशन :‘हसमुख’ गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अधिवेशनास आजपासून सुरुवात होत आहे. पुण्यातील बॉम्बस्फोट, आसामातील जातीय दंगल, महागाई, महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांवर असलेले दुष्काळाचे गंभीर सावट हे या अधिवेशनातील प्रमुख मुद्दे असतील. परंतु खरी कसोटी असेल ती आपल्या सोलापूरकर ‘ हसमुख ’ गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची. प्रणव मुखर्जी यांच्या जागी लोकसभेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांचे हे पहिलेच अधिवेशन असून बांग्लादेशातील घुसखोरांमुळे घडलेली आसामची दंगल, पुण्यातील बॉम्बस्फोट आणि वीज संकट या मुद्द्यांवर विरोधक त्यांना घेरण्याची शक्यता आहे.
नॅशनल ग्रीड कोलमडल्याने गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस उत्तर भारत अंधारात असतानाच सुशीलकुमार शिंदे यांची ऊर्जामंत्रिपदावरून गृहमंत्रिपदी पदोन्नती झाली. गृहमंत्रिपदावर बसताच पुणे चार बॉम्बस्फोटांनी हादरले. त्याचबरोबर आसाममध्ये बांग्लादेशी घुसखोरांमुळे उद्भवलेली दंगल अशा एकापाठोपाठ घटना घडल्या आहेत. शिवाय संसद व संसदेबाहेर काँग्रेसचे संकटमोचक असलेले प्रणवदा यांच्यासारख्या कसलेल्या नेत्याच्या जागी सुशीलकुमार शिंदे यांची लोकसभा नेतेपदी निवड झाली आहे. यूपीए सरकारला घेरण्यासाठी भाजपसह विरोधी पक्ष सरसावला असताना सुशीलकुमार यांची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे.
आसाममधील जातीय दंगलीचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही आसामची दंगल म्हणजे देशावरील कलंक असल्याचे विधान केले होते. विशेष म्हणजे आसाममध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या पार्श्वभूमीवर आसाम दंगलीच्या निमित्ताने भाजप बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणणार हे निश्चित. पुण्यातील बॉम्बस्फोट आणि पॉवर ग्रीड कोलमडल्याचा मुद्दा हा थेट सुशीलकुमार यांच्याशीच निगडित आहेत. विरोधकांच्या या मुद्द्याला शिंदे कसे तोंड देतात याकडे पक्षाचे लक्ष लागून आहे.
महागाई, दुष्काळ - विरोधकांनी स्पेक्ट्रम आणि कोळसा ब्लॉक वाटपप्रकरणीही नोटीस दिली आहे. शिवाय लोकपाल विधेयकावरही चर्चा अपेक्षित आहे. मात्र लोकपालचा विषय या अधिवेशनाच्या कार्यक्रमपत्रिकेत नाही. परंतु वाढती महागाई रोखण्यात सरकारला आलेले अपयश आणि दुष्काळचे संकट हे मुद्देही अधिवेशनात चर्चेला येतील.
31 विधेयकांवर पावसाळी अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे. यामध्ये बँकिंग कायदा, भ्रष्टाचाराविरुद्धचे व्हिसल ब्लोअर विधेयक, महिला आरक्षण यांसारखी महत्त्वाची विधेयके आहेत.लोकपाल विधेयक कार्यक्रमपत्रिकेत नाही. परंतु संसदेच्या स्थायी समितीने शिफारस केल्यास लोकपाल विधेयकाचा या अधिवेशनात समावेश केला जाऊ शकतो, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
सुशीलकुमार शिंदे लोकसभेत काँग्रेसच्या नेतेपदी