आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराज्य मिळाले, सुराज्य नाही- नरेंद्र मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीच्या राजकारणाचे दार ठोठावले. दुपारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट तर सायंकाळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या श्रीराम महाविद्यालयातील तरुणाईला मार्गदर्शनपर भाषण केले. देशाला आता ‘गुड गव्हर्नन्स’ची प्रतीक्षा आहे, असे सांगताना मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या विकासाचे जोरदार मार्केटिंग केले. गेल्या काही दिवसांपासून भाजप मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करणार याची चर्चा रंगली आहे. कुंभमेळ्यातील संत आखाड्यात त्यावर शिक्कामोर्तब होणार, अशीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या दिल्ली भेटीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. मोदी दिल्लीत पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यग्र असताना भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह अलाहाबादेत गंगास्नान करून संत समागमात सहभागी झाले. मात्र विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत मोदींविषयी कोणतीच चर्चा झाली नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोदींचा फॉर्म्युला
मोदींनी भाषणात आपल्या यशाचे काही मंत्र सांगितले.
पीटूजी : प्रो-पीपल गुड गव्हर्नन्स (सरकारच्या उद्देशासाठी)
फाइव्ह एफ : फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन व फॉरेन (कपडा उद्योगासाठी)
डबल पी 5: प्रॉडक्ट व पॅकेजिंग (मार्केटिंगसाठी )
ट्रिपल एस : स्किल, स्केल व स्पीड(सरकारी कामकाजासाठी)
एआयएस : कृषी, इंडस्ट्री व सेवा क्षेत्र (गुजरात सरकारचे प्राधान्य)

भाषणातील चार ठळक मुद्दे
विकास : वेगळे राजकारण नाही
मोदींनी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये केवळ विकासाची चर्चा केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,‘व्होट बँकेच्या राजकारणाने देशाचे नुकसान केले आहे. त्यापासून अलिप्त होऊन आता विकासाचे राजकारण करावे लागेल.’

विश्वास : सर्व काही ठीक होऊ शकते
जेथे जातो तेथे लोक निराश दिसतात. सगळेच चोर आहेत, देशाचे काहीच होऊ शकत नाही. येथून बाहेर पडा, असे म्हणतात. परंतु मुख्यमंत्री म्हणून माझा अनुभव सांगतो की हीच नोकरशाही, व्यवस्था व नियम, कायद्यांआधारे देश बदलता येऊ शकतो.

तरुणाई : भारत सर्वात युवा देश
भारत सर्वात युवा देश आहे. 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. ते न्यू एज व्होटर नव्हे तर न्यू एज पॉवर आहेत. युरोप, चीन, जपान म्हातारे होत आहेत. या स्थितीत भारताकडे जगावर ठसा उमटवण्याची क्षमता आणि संधी आहे.

दृष्टिकोन : अर्धे पाणी, अर्धी हवा
अर्धा ग्लास पाणी व अर्धा ग्लास हवेने व्यापलेला आहे. कुणाला पाण्याचा ग्लास अर्धा दिसतो तर कुणाला ग्लास रिकामा. परंतु माझ्याकडे तिसरा दृष्टिकोन आहे. ग्लास अर्धा पाण्याने आणि अर्धा हवेने भरलेला आहे, असा विचार मी करतो.
मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी
नरेंद्र मोदींच्या विरोधात श्रीराम महाविद्यालयाबाहेर डाव्या संघटनांच्या
विद्यार्थी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली. ते ‘मोदी गो बॅक’ असे
नारे ते देत होते. ‘आयसा’ ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ने मोदींच्या विरोधात आधीपासूनच घोषणाबाजी केली होती.