आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडमध्ये नक्षली हल्ल्यात 13 जवान शहीद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गढवा - झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील भदरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी नक्षल्यांनी पोलिसांची दोन वाहने भूसुरुंगाने उडवली. यात ठाणे अंमलदारासह 13 पोलिस शहीद झाले. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले असून दोघांनाही हेलिकॉप्टरने तात्काळ रांचीला हलवण्यात आले. नक्षल्यांनी पोलिसांच्या 14 बंदुकाही पळवल्या.
गोळ्या घातल्या, आगीत फेकले : भाकपच्या माओवादी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून त्यात जखमी झालेल्या पोलिसांना अत्यंत क्रूरतेने मारले. पोलिसांची वाहने उडवून दिल्यानंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार करत जवानांना घेरले. ठाणे अंमलदार राजबली चौधरी आणि त्यांच्या चालकाला अगोदर गोळ्या घातल्या आणि जळत्या गाडीत दोघांनाही फेकले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे मानले जाते. भूसुरुंगाचा स्फोट होताच चारही दिशांनी नक्षलवाद्यांनी पोलिसांना घेरले होते. प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याची किंवा बचावाची संधीच पोलिसांना नव्हती.
स्फोटानंतर चारही दिशांनी तुफान गोळीबार सुरू होता.
चकमक सुरूच : घटनेनंतर गढवाचे पोलिस अधीक्षक एस. मायकल राज व सीआरपीएफच्या कमांडंटच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी नक्षल्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत या भागात चकमक सुरू होती.
नेत्याला सोडण्याची मागणी : हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना नक्षलवाद्यांनी आपल्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका साथीदाराची सुटका करावी, अशी मागणी केली. या नक्षली नेत्याला गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचा दावाही नक्षलवाद्यांनी केला. या नेत्याला पकडल्यापासून पोलिसांनी सतत या भागात कारवाई केल्याने हा सूड उगवल्याचे नक्षल्यांनी नमूद केले.
सरकारचे अपयश
छतरा येथील अपक्ष खासदार इंदरसिंह नामधारी यांनी शनिवारचा हल्ला सरकार व पोलिसांचे मोठे अपयश असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वी नामधारी यांच्या लवाजम्यावर असाच हल्ला झाला होता. मात्र यातून ते थोडक्यात बचावले होते.