आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांनी काढले मोबाइल बंदीचे फर्मान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तीसगडमधील बिजापूर व नारायणपूर जिल्ह्यातील ग्रामस्थांना माओवाद्यांनी मोबाइल न वापरण्याचा सल्ला दिला आहे. मोबाइल वापराल तर तुमची खैर नाही, असा इशारा नक्षलवाद्यांनी घोषणा करून पत्रके वाटून दिल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ग्रामस्थ सेलफोनद्वारे पोलिस, सुरक्षा यंत्रणेचे खबरे म्हणून काम करत असल्याचा नक्षलवाद्यांना संशय आहे. त्यामुळे ते चिडले असून त्यांनी ग्रामस्थांना थेट इशारा दिला आहे. राज्यातील बिजापूर, नारायणपूर, सुकमा व कोंडगाव जिल्ह्याशिवाय बिहारमधील गया व ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यातही मोबाइल सेवेचा विस्तार करण्याच्या कामात नक्षलवादी अडथळे आणत आहेत. पोलिस उपमहासंचालक रामनिवास यांनी मोबाइलवरून नक्षल्यांनी ग्रामस्थांना इशारा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. याचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. मोबाइल सेवा विस्कळीत करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी या जिल्ह्यांमध्ये सरकारी तसेच खासगी मोबाइल कंपन्यांचे टॉवर उडवून लावले आहेत. गेल्या चार वर्षांत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी चार मोठे टॉवर उडवून दिले. मलकानगिरी जिल्ह्यातही गतवर्षी त्यांनी एक टॉवर उडवले होते. तेव्हापासून त्या भागात मोबाइल सेवा अद्यापपर्यंत खंडित आहे.