Home »National »Delhi» NCTC Hydrabad Blast On Sushilkumar Shinde

‘एनसीटीसी’साठी नव्याने प्रयत्न; शिंदेंच्या ‘सेल्फ गोल’मुळे अडचण

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 24, 2013, 08:35 AM IST

  • ‘एनसीटीसी’साठी नव्याने प्रयत्न; शिंदेंच्या ‘सेल्फ गोल’मुळे अडचण

नवी दिल्ली - हैदराबाद बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर सरकार दहशतवादविरोधी केंद्राच्या (एनसीटीसी) स्थापनेसाठी नव्याने प्रयत्न करणार आहे. काँग्रेस आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ नेतृत्वाने हा मुद्दा गांभीर्याने घेत दहशतवादाच्या विरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावू शकणार्‍या एनसीटीसीच्या आवश्यकतेबाबत विचार सुरू केला आहे. राजकीय अपरिहार्यतेपोटी सरकारला या मुद्दय़ावर याआधी माघार घ्यावी लागली; परंतु हैदराबाद स्फोटानंतर सरकार त्यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहे.

एनसीटीसीतील काही तरतुदींना आक्षेप घेत अनेक राज्यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे या दहशतवादाच्या विरोधातील या सर्वोच्च संस्थेची स्थापना होऊ शकली नाही. राज्यांच्या विरोधानंतर सरकारने हा मुद्दा थंड बस्त्यात टाकून दिला होता; परंतु आता राज्यांना पाठिंबा मागण्यासाठी सरकार त्यांना लवकरच पत्र लिहिणार आहे. तसेच राजकीय पक्षांसोबत चर्चा करून त्यांनाही सोबत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी एनसीटीसीच्या मुद्दय़ावर राज्यांनी सरकारला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हा मुद्दा कुणावर थोपवता येणार नाही. तर सर्व राजकीय पक्ष, राज्य सरकारे व केंद्र सरकारच्या पातळीवर सहभागी असलेल्या सर्व लोकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. राजकीय फायद्याचा संकुचित दृष्टिकोन समोर ठेवण्याऐवजी आम्हाला त्यावर देशहिताचा विचार करावा लागेल.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हैदराबादेतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून पूर्ण अहवाल मागवला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्यासोबतही या नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यावर सरकारचा भर आहे.

शिंदेंच्या ‘सेल्फ गोल’मुळे अडचण
दहशतवादी हल्ल्यामुळे केंद्र सरकारला पुन्हा एकदा बॅकफूटवर जावे लागले आहे. या मुद्दय़ावर सरकारच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नांना यामुळे जबरदस्त धक्का बसला आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुप्तचर यंत्रणेकडे स्फोटाबाबत इनपुट असल्याचे सांगून दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सरकारच्या अडचणी वाढल्या असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केले.

दोन्ही ठिकाणी काँग्रेसचेच सरकार असल्याने गुप्तचरांनी दिलेल्या इशार्‍यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या स्थितीत एनसीटीसीच्या स्थापनेसाठीचा मुद्दा पुढे करून दहशतवादाच्या मुद्दय़ावर सरकार गंभीर असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकते. गृहमंत्री शिंदे यांनी दिलेली अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारीबाबत काँग्रेसमधील एक गट अस्वस्थ आहे. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, गृहमंत्रिपद हे खूपच जबाबदारीचे पद आहे. शिंदे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु कुठलेही वक्तव्य करताना त्यांनी सावध राहिले पाहिजे. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीबाबत कालर्मयादेचे आश्वासन देऊन शिंदे आधीच अडकले आहेत. हिंदू दहशतवादाबाबतचे वक्तव्य सपशेल माघारी घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. शिंदेंच्या या सेल्फ गोलमुळे पक्षाचीही अडचण होत आहे, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

Next Article

Recommended