आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांचा पूर येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही चॅनल सुरू करण्यासाठी सरकारकडे अर्जांचा महापूर आला आहे. यातील अर्ध्यापेक्षा जास्त अर्ज राष्ट्रीय किंवा प्रादेशिक वृत्तवाहिन्यांसाठी आहेत.
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरवेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि राज्यांच्या निवडणुकांपूर्वीही राष्‍ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील वृत्तवाहिन्या सुरू करण्यासाठी मंत्रालयाकडे अर्ज येतात. मात्र, या वेळी अर्जांची संख्या बरीच मोठी आहे.

तथापि या क्षेत्रातील उथळपणाला आळा घालण्यासाठी वृत्तवाहिनी सुरू करण्यापूर्वी कंपनीचे एकूण भांडवल 20 कोटी रुपये आणि वृत्तविरहित वाहिनीसाठी 5 कोटी रुपये असावे, असा नियम करण्यात आला आहे. प्रसारण क्षेत्रातील नियामक संस्था ट्रायने मंत्रालयाकडे शिफारस केली होती की, न्यूज चॅनलसाठी किमान 100 कोटी रुपयांची अट कंपनीला घालावी. मात्र, मंत्रालयाचे म्हणणे आहे की, तसे केल्यास न्यूज चॅनलवर फक्त कॉर्पोरेट घराण्यांचीच मक्तेदारी निर्माण होईल. त्यामुळे 20 कोटी रुपयांचीच मर्यादा योग्य आहे.

माहिती-प्रसारण मंत्रालयाने आतापर्यंत सुमारे 850 वाहिन्यांना भारतात प्रसारणाची परवानगी दिली आहे. यातील 425 पेक्षा जास्त वृत्तवाहिन्याच आहेत. मंत्रालयाने नुकतेच एनओसीसीकडे (नेटवर्क ऑपरेशन सेंटर) विचारणा केली आहे की, कुठल्या वाहिन्या सुरू आहेत आणि कुठल्या नाहीत त्याची माहिती द्यावी.

एनओसीसी उपग्रहाच्या माध्यमातून वाहिन्यांच्या प्रसारणावर निगराणी ठेवते. याशिवाय देशात सुरू असलेल्या टेलिपोर्ट्सनाही सांगण्यात आले आहे की, त्यांच्याकडील कुठल्या वाहिन्या भारतात अपलिंक होत आहेत याची माहिती वेळोवेळी द्यावी. ज्या वाहिन्या भाड्याने चालवल्या जात आहेत त्यांचे प्रसारण रोखण्यासाठी असे प्रयत्न केले जात आहेत. अशा वाहिन्या चालवणा-यांकडे मंत्रालयाची प्रसारणाची परवानगी नाही. त्यांना संबंधित कंपनीने ठरावीक रकमेच्या मोबदल्यात निनावी पद्धतीने अशा वाहिन्या चालवण्याची मंजुरी दिली आहे. सूत्रांनी असेही सांगितले की, प्रसारणाची परवानगी मिळवल्यानंतर ठरावीक दिनांक उलटून गेल्यानंतरही चॅनल सुरू केले नाही, अशा 25 चॅनलची यादी मंत्रालयाकडे आहे. या चॅनल्सवर कारवाई होऊ शकते.

माहिती-प्रसारण मंत्रालयाकडे अर्जांचा खच
दीडशेवर अर्ज पडून
देशात आधीपासूनच 400 हून जास्त वृत्तवाहिन्या कार्यरत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वाहिन्या सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे 152 अर्ज पडून आहेत. त्यातील 75 पेक्षा जास्त अर्ज न्यूज चॅनलसाठी आहेत. यातील काही राष्‍ट्रीय वृत्तवाहिन्यांसाठी, तर बहुतांश अर्ज प्रादेशिक वृत्तवाहिन्या सुरू करण्यासाठी आहेत.