आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निर्भय’ची चाचणी लवकरच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - भारत पुढील महिन्यात सबसॉनिक (ध्वनीच्या गतीपेक्षा कमी वेग) क्रूझ ‘निर्भय’ या क्षेपणास्त्राची पुढील महिन्यात चाचणी घेऊ शकतो. मध्यम पल्ल्याचे हे क्षेपणास्त्र एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (एडीई) विकसित केले आहे. एडीई हे संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळेचे नाव आहे.
संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही. के. सारस्वत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या क्षेपणास्त्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या काही चाचण्या सध्या घेतल्या जात आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यात त्याची अंतिम चाचणी घेतली जाईल. एडीएचे संचालक पी. एस. कृष्णन यांनी सांगितले की, ओडिशातील चांदीपूर तळावरील एकीकृत परीक्षण केंद्रावरून हे क्षेपणास्त्र हवेत झेपावेल.

सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्यानंतरच त्याच्या लष्करातील सहभागाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. क्षेपणास्त्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्याही वातावरणात काम करू शकते.

पाच महिने विलंब; दोनदा मुदतवाढ
या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी ऑक्टोबर 2012 मध्ये घेण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. नंतर ही मुदत डिसेंबर 2012 पर्यंत वाढवण्यात आली. आता फेब्रुवारी 2013 मध्ये प्रत्यक्ष त्याची चाचणी घेतली जात आहे. सारस्वत यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षेपणास्त्र विकासाची प्रक्रिया व त्याच्या चाचण्या तांत्रिकदृष्ट्या किचकट आणि वेळखाऊ आहेत. त्यामुळे त्याला विलंब झाला आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
‘निर्भय’ची वैशिष्ट्ये
*गनिमी काव्याने शत्रूवर अचूक लक्ष्य साधण्याचे कौशल्य हे या क्षेपणास्त्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
*हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक लक्ष्यभेद करू शकते.
* क्षेपणास्त्राची मारक क्षमता 750 किलोमीटर असून ती 1000 किलोमीटरपर्यंत वाढवली जाऊ शकते.
* जमिनीवरून, हवेतून तसेच समुद्रातूनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकते.
* त्या दृष्टिकोनातून लष्कर, वायुदल व नौदल अशा तिन्ही दलांसाठी हे क्षेपणास्त्र उपयोगी ठरू शकते.