आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या मते ‘पारंपरिक’ उपचार प्रभावी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बहुतांश रुग्ण अ‍ॅलिओपॅथी कुठल्याही आजारावर प्रभावी उपचार पद्धती असल्याचा ठाम दावा करत असतील. परंतु देशातील 70 टक्के एमबीबीएस डॉक्टर ‘पारंपारिक औषधी’ किंवा आजीबाईच्या बटव्यावर विश्वास ठेवून अ‍ॅलिओपॅथीसोबत त्यांचा वापर करण्याचा सल्ला रुग्णांना देतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.
बहुतांश डॉक्टरांच्या मते आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व सिद्धा या सारख्या पारंपारिक चिकित्सा उपचार पद्धतींची आजही गरज आहे.नॅशनल हेल्थ सिस्टम रिसोर्स सेंटरतर्फे (एनएचएसआरसी) देशातील 18 राज्यांत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालात 55 टक्के एमबीबीएस डॉक्टर कुठल्याही किरकोळ किंवा दुय्यम आजारांवर अ‍ॅलिओपॅथीसोबतच पारंपारिक किंवा घरगुती औषधांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. मात्र, या गोष्टींचा उल्लेख रुग्णाच्या केसपेपरमध्ये नसतो. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनने (एनआरएचएम) ‘आयुष की स्थिती’ या नावाने अहवाल तयार केला आहे. त्यात बहुतांश डॉक्टर देशातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी आयुष पद्धती उपयुक्त पर्याय असल्याचे मान्य करतात. एमबीबीएसची पदवी संपादन केलेल्या डॉक्टरांच्या मते आयुष पद्धती दुर्गम भागात पोहोचविण्यासाठी व ती प्रचलित करण्यासाठी वेगवेगळ्या आजारांवर देशी औषधांवर आणखी संशोधन होण्याची गरज आहे.

पारंपारिक उपचारांवर सरकारचा भर
आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्र्गम भागात आयुष पद्धती पोहोचविण्यासाठी 12 व्या पंचवार्षिक योजनेत पारंपारिक उपचार पद्धतीला प्राधान्य देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. एनआरएचएम अंतर्गत ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर जाण्यास तयार होत नाहीत, अशा ठिकाणी पारंपरिक पद्धतीने उपचार करणारे डॉक्टर तैनात करण्यात येणार आहेत. या डॉक्टरांना इतर डॉक्टरांप्रमाणे वेतन व सुविधा दिल्या जातील.