आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक ग्राहक, मोबाइल कंपन्यांना नकोसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- सामान्यपणे एखादा राष्‍ट्राध्यक्ष, बडा सेलिब्रिटी आपले उत्पादन वापरत असेल तर कंपन्यांसाठी अभिमानाची बाब ठरते. जसे की ओबामांच्या हाती आल्याने ब्लॅकबेरीला व चीनचे वेन जिआबाओ यांच्या वापरात आल्याने नोकियाला धन्यता वाटली. उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग-अन छायाचित्रात मोबाइलसह आढळून आले आणि हात झटकण्याचे सत्र सुरू झाले.

उ. कोरियाच्या एका प्रसिद्धीपत्रकातील फोटोमध्ये वेगळे काहीच नव्हते. ते काहीतरी पाहत होते. त्यांचे वस्तूंकडे पाहणे एवढे लोकप्रिय आहे की यासाठी एक पूर्ण वेबसाइटच आहे. kimjongunlookingatthings.tumblr.comफोटोमध्ये नेहमीप्रमाणे त्यांच्या बोटांमध्ये सिगारेट आहे. वेगळेपण होते ते त्यांच्या भल्यामोठ्या अ‍ॅशट्रेच्या बाजूला ठेवलेला एक टच स्क्रीन फोन.
उत्तर कोरियाने मंगळवारी एक व्हिडिओ प्रसारित करून अमेरिकेवर हल्ले आणि अण्वस्त्र चाचणीची धमकी दिली होती. परंतु त्याहीपेक्षा हा फोन कोणत्या कंपनीचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरले. काही लोकांनी तो सॅमसंग गॅलॅक्झी एस-3 असल्याचे तर्क लढवले. सॅमसंगने तत्काळ खंडन केले. कोणताही असेल, पण सॅमसंग नाही, असे कंपनीने म्हटले. सॅमसंग दक्षिण कोरियाची कंपनी आहे आणि दोन्ही कोरियांमध्ये दोन्ही दिशांइतकाच दुरावा आहे. युद्धाची स्थिती ओढवली तर आपल्या देशाचा आपल्यावर रोष ओढवला जाऊ नये, अशी भीती सॅमसंगच्या मनात होती. मग संशयाची सुई आयफोनच्या दिशेने सरकली. परंतु तशा अँगलने पाहता हा फोन आयफोनसारखा दिसत नव्हता. दुसरीकडे किम यांच्या मतानुसार आयफोन तर ‘राक्षस’ अमेरिकेने बनवलेला आहे. मग श्रीमान किम तो कशासाठी वापरतील. अखेर दोष दक्षिण कोरियाच्या माथी मारला जाऊ नये यासाठी बुधवारी दक्षिण कोरियाच्या एका प्रवक्त्याने भूमिका स्पष्ट केली. देशातील सुरक्षा यंत्रणांनी छायाचित्राचा सखोल अभ्यास केला आणि तैवानच्या एचटीसी कंपनीचा हा स्मार्टफोन असू शकतो असा निष्कर्ष काढला, असे या प्रवक्त्याने स्पष्ट केले. तैपेईहून एचटीसीने या वृत्ताचे खंडन केले नाही, परंतु दुजोराही दिलेला नाही. एक ओळीचे पत्रक काढून कंपनीने म्हटले की, ‘कंपनी प्रत्येक प्रकारच्या ग्राहकाचा आदर करते.’

हा फोन जर एचटीसीचा अँड्रॉइड फोन असेल तर गुगलचे एरिक श्मिट चांगलेच खुश झाले असतील. श्मिट अलीकडेच उत्तर कोरियाच्या दौ-यावर जाऊन आले आहेत. नकाशाशिवाय हा देश पाहणा-या काही मूठभर लोकांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. कदाचित गुगलच्या वतीने त्यांना ते गिफ्टही असू शकते.

आता प्रश्न हा उरतो की एवढे निर्बंध असलेल्या देशात स्मार्टफोनचा उपयोग काय? मित्रहो, या देशातील 15 लाख लोकांकडे फोन आहे. औरंगाबाद शहरात वापरात असलेल्या फोनसंख्येच्या ती निम्मीदेखील नसेल. परंतु उत्तर कोरियासाठी ती देशाच्या लोकसंख्येच्या पाच टक्के आहे आणि ती मोठी उपलब्धी मानली जाते. किम जोंग अन यांचे पिता किम जोंग इल यांनी बराच खल करून 2008 मध्ये मोबाइल नेटवर्कला परवानगी दिली होती. गतवर्षीच त्यांच्या निधनानंतर अदमासे पंचेवीस वर्षे वय असलेले अन सत्तेवर आरूढ झाले. सरकारने अलीकडेच इजिप्तची कंपनी ओरस्कोमच्या मदतीने थ्रीजी नेटवर्क सुरू केले आहे. सर्वांनाच फोनवर इंटरनेट वापरण्याची मुभा नाही. ती फक्त किम जोंग अन यांच्यामार्फत अधिकृत लोकच ते वापरू शकतात.

प्रत्येक जण मोबाइल फोन घेऊदेखील शकत नाही. गरिबी एवढी आहे की, सामान्य नॉन स्मार्टफोनची किंमतच उत्तर कोरियातील नागरिकाच्या सरासरी मासिक उत्पन्नाच्या 25 पट आहे. एवढे असूनही पैसे असले तरी सरकारचे हेर पहिल्या महिन्यात चहुबाजूंनी चौकशी करतात आणि मगच सिमकार्ड दिले जाते. त्यामुळे सरकारमधील मोजके लोक आणि काही धनिक कुटुंबेच मोबाइल बाळगतात. यातही बहुतांश चीनमधून तस्करी करण्यात आलेले स्वस्त, फ्लीप फोन आहेत. चीन सीमेलगतची गावे, वाड्यांवर तर मोबाइल फोनची चलती आधीपासूनच सुरू झाली होती. चीनच्या सीमकार्डवर आणि सीमेपलिकडील मोबाइल सेवेच्या सिग्नल्सवर ते चालत होते. मग सरकारने या बेकायदा वापरावर कारवाई केली. शेकडो लोकांना तुरुंगात पाठवले गेले. यंदाच्या सुरुवातीला या ‘समाजकंटकांना’ गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले.