आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- निम्मा पावसाळा सरत आला, तरी देशात पाऊस नसल्यामुळे यंदाच्या हंगामात कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थातच दर कडाडणार आहेत. म्हणून स्वयंपाक घरातील महत्त्वाचा पदार्थ असलेला कांदा यंदा गृहिणींसह सर्वांना रडवण्याची शक्यता आहे .
महाराष्ट्र, गुजरात ही राज्ये कांदा उत्पादनाची महत्वाची राज्ये आहेत. या दोन्ही राज्यांत पाऊसमान घटल्याने कांदा निम्म्यावर येईल. देशातील कांद्याची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर-डिसेंबर या काळात येणारी आवक प्रचंड प्रमाणात घटणार असल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम म्हणून कांद्याचे दर कडाडणार आहेत. सध्या दिल्लीसह देशाच्या विविध भागात किरकोळ बाजारात कांदा प्रती किलो 10-15 रुपये आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही कांद्याचे लागवड क्षेत्र पन्नास टक्क्यांवर आहे. ही सध्याची परिस्थिती आहे, परंतु अजूनही चांगला पाऊस झाला, तर कांद्याचे चांगले उत्पादन होऊ शकते व परिस्थितीत सुधारणा होईल. कांद्याचा पेरा 15 जुलै ते 15 ऑगस्ट या काळात केला जातो. अर्थात आणखी काही दिवस कांद्याच्या लागवडीला वाव आहे .
ऑक्टोबरपर्यंत ताटात तडका !
सध्या कांद्याचा साठा पुरेसा आहे, परंतु हा साठा केवळ ऑक्टोबरपर्यंत चालेल. त्यानंतर सर्वांनाच पुढच्या हंगामाची प्रतीक्षा करावी लागेल. घरगुती गरज पूर्ण करण्याइतका साठा सध्या उपलब्ध असल्याने ऑक्टोबरपर्यंत तरी ताटातील कांद्याचा तडका कायम राहणार आहे .
डिसेंबरात आशा
निम्मा पावसाळा गेला असला, तरी नजीकच्या काही दिवसांत पाऊस झाला तर त्याचा फायदा डिसेंबरमध्ये होणा-या पेरणीसाठी होऊ शकतो. त्यामुळे कांदा उत्पादकांना तेवढी एक आशा आह, परंतु त्यासाठी अगोदर काही प्रमाणात पाऊस होणे अपेक्षित असल्याचे नाशिक येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन-विकास फाउंडेशनचे संचालक आर. पी. गुप्ता यांनी सांगितले.
नाशकात 29 कोटींचा फटका
पाणी टंचाईने घटलेल्या कांद्याच्या उत्पादनाने सिन्नरच्या बाजारपेठेस तब्बल 29 कोटींचा फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत बाजार समितीत कांद्याची 40 टक्के आवक कमी झाली. साहजिकच शेतक-यांना उत्पन्न न मिळाल्याचा फटका सिन्नरच्या बाजारपेठेतील एकूण उलाढालीवर ही झाला आहे.
कांदा उत्पादनात निफाड तालुक्यानंतर सिन्नरचा क्रमांक लागतो. दुष्काळी स्थितीमुळे रोपे असूनही त्याची लागवड होऊ शकली नाही. त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. 2011-12 या वर्षात केवळ नऊ लाख 18 हजार 421 क्विंटल कांदा आवक झाली. गतवर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे पाच लाख दोन हजार क्विंटलने घट झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.