आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओडिशात सरकार उलथवण्याचा कट, बंडखोरांची मुख्यमंत्र्यांसमोर कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - मुख्यमंत्री नवीन पटनायक लंडनवारीवर असताना त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला; परंतु तो फसला, अशी कबुली ओडिशातील बिजू जनता दलाच्या पाच बंडखोर आमदारांनी दिली आहे. खासदार प्यारी मोहन महापात्रा यांना विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यासाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले होते, असा गौप्यस्फोट आमदारांनी केला आहे.

आमदार सुशांत सिंह, संजीब प्रधान, सुबर्ना नायक, देवेंद्र कन्हार आणि भगवान कन्हार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पटनायक यांची भेट घेतली. महापात्रा यांनी कशाचा घाट घातला आहे त्याची आम्हाला कल्पना नव्हती. मंगळवारी महापात्रा यांच्या भेटीवेळी कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले; पण आम्ही स्वाक्षरी केली नाही, असे या पाच आमदारांनी सांगितले. दरम्यान, पक्षातील बंडोबा थंडोबा झाले असले तरीही पटनायक यांचे बैठकांचे सत्र आजही सुरूच होते.

बंडखोरांची बैठक : पटनायक यांच्याखालोखाल महापात्रा यांचा बिजू जनता दलात दरारा आहे. मुख्यमंत्री परदेशवारीवर असताना खासदार महापात्रा यांच्या निवासस्थानी 29 मे रोजी तीन मंत्र्यांसह 33 आमदारांची बैठक झाली होती. महापात्रा यांचे सत्ता उलथवण्याचे कारस्थान लक्षात येताच पटनायक यांच्या सर्मथकांनीही समांतर बैठक घेतली होती. परंतु दुसर्‍याच दिवशी महापात्रा यांनी कोलांटउडी घेत पटनायक यांची सत्ता उलथवण्याची योजना नसल्याचा खुलासा केला होता. मुख्यमंत्री गुरुवारी लंडनहून रात्री परतल्यानंतर त्यांनी आमदार, नेत्यांच्या मुलाखती, राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.
ओडिशातील बंड शमले; पटनायक मायदेशी
नवीन पटनायक परदेशात, सिंहासन डामडौल