आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आऊटसोर्सिंग क्षेत्र अडचणीत!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काळ नेहमीच एकसारखा नसतो. या विधानाची प्रचिती आगामी काळात आऊटसोर्सिंग क्षेत्राला येण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रावर लक्ष ठेवून असणा-या विश्लेषकांच्या दाव्यानुसार 2014 नंतर या क्षेत्रात अनेक अडचणी तसेच मंदीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचा फटका भारतासह चीन, ब्राझील यासारख्या प्रमुख देशांना बसू शकतो.
आऊटसोर्सिंगवर लक्ष ठेवणा-या अमेरिकन कंपनी हॅकेटने 2014 नंतर आऊसोर्सिंग क्षेत्र पूर्णपणे मंदीच्या फे-यात अडकू शकते असा इशारा अहवालाद्वारे दिला आहे. या क्षेत्रातील कामगिरी 2022 पर्यंत पूर्णपणे खालावली जाऊ शकते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अतिशय सहजतेने आऊटसोर्स करता येऊ शकतील, अशा बहुतांश नोक-या भारतासह अनेक देशांच्या झोळीत याआधीच गेल्या आहेत. हजारो अन्य नोक-यांचे आऊटसोर्सिंग आता होऊ शकणार नाही. याचे कारण अनेक विदेशी कंपन्यांनी उत्पादकता वाढवण्यासाठी तसेच कॉस्ट कटिंगमुळे अशा नोक-या संपुष्टात आणल्या आहेत. पाश्चात्त्य देशांत निर्माण होणा-या नव्या नोक-या मिळवण्यासाठी कर्मचा-यांना जास्त कुशल व्हावे लागणार आहे.

स्थानिकांनाच प्राधान्य दिले जात असल्याने या नोक-यांचे आऊटसोर्सिंग यापुढील काळात सहज शक्य होणार नाही.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आऊटसोर्सिंग क्षेत्राला झटका बसण्याचे आणखी एक कारण असे की, उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने विदेशी कंपन्या त्यांच्या नोक-या भारतासह विविध देशांत पाठवत आल्या आहेत. परंतु त्यातून फारसा लाभ होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. उलट भारतासारख्या देशांत सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचे वेतन बरेच वाढले आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्याऐवजी वाढला आहे.सल्लागार कंपनीच्या अधिका-याने सांगितले की, आऊटसोर्सिंग करणा-या कंपनीच्या मूळ देशात कार्यरत असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचे वेतन व त्यांच्या भारतातील युनिटमध्ये काम करणा-या इंजिनिअरच्या वेतनात सुरुवातील 80 टक्के फरक असायचा. आता हे अंतर केवळ 30 ते 40 टक्के उरले आहे. या शिवाय आऊटसोर्सिंगमध्ये हिडन कॉस्ट अधिक असते. त्याचे प्रमाणही वाढत आहे. या स्थितीत अमेरिकेन कंपन्या आऊटसोर्सिंग करण्याऐवजी त्यांच्याच देशात नोक-या निर्माण करत आहेत.