आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान नरम, चर्चेसाठी तयार; भारत गरम, आधी माफी मागा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या परराष्‍ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांच्या चर्चेच्या प्रस्तावावर भारताने कठोर भूमिका स्वीकारली आहे. आपल्या नृशंस कारवायांबद्दल आधी माफी मागा, आगळीक कबूल करून अपराध्यांना शिक्षा द्या, यानंतरच चर्चेच्या प्रस्तावावर विचार करता येईल, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.

पाकिस्तानसोबत आता पूर्वीसारखे संबंध राहू शकत नाहीत, असा संदेश भारताने दिला आहे. यातून धडा घेत पाकिस्तानने अपराध्यांवर कारवाई करावी, असे तिवारी यांनी सांगितले. दुसरीकडे, मंत्रिपातळीवरील चर्चा घाई-गोंधळात होऊ शकत नाही, असे परराष्‍ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केले आहे. आपल्याला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागेल, असेही ते म्हणाले. नियंत्रण रेषेवर युद्धविराम कायम राखण्यासाठी उभय देशांना सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज असल्याचे हिना यांनी बुधवारी म्हटले होते. मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी परराष्‍ट्र मंत्री पातळीवर चर्चा होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या होत्या.

पंतप्रधान अशरफविरुद्ध ठोस पुरावा नाही : एनएबी
पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांना अटक करण्यास पाकिस्तानच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक संस्थेने (एनएबी) स्पष्ट इन्कार केला आहे. अशरफ यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे कारवाई करता येणार नाही, असे एनएबी म्हटले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने संस्थेला पुरावे देण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश इफ्तिखार चौधरी यांनी एनएबीला या प्रकरणात अहवाल मागवला आहे. एनएबीचे वकील के.के. आगा म्हणाले, सर्वाेच्च न्यायालय ही एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास करण्याचे काम त्यांचे नाही. म्हणूनच एनएबीच्या अहवालांची पाहणी करण्याचा अधिकार न्यायालयास नाही. त्यावर चौधरी भडकले आणि म्हणाले, आमचे काम न्याय देणे आहे. आम्ही दस्तऐवजांच्या पुराव्यावरून आदेश दिले आहेत. काही लोक स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत असावेत; परंतु तसे असू शकत नाही. आपली यंत्रणा त्यांच्याविरुद्ध कारवाई का करू शकत नाही, अडथळा नेमका कोठे आहे.
कॅबिनेटला दिली माहिती
संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी आणि परराष्‍ट्र मंत्री खुर्शीद यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाला सीमेवरील घडामोडींची माहिती दिली. पाकिस्तानने आपली भूमिका मवाळ केली असून द्विपक्षीय चर्चेचा प्रस्ताव दिला असल्याचे खुर्शीद यांनी सांगितले. पाकिस्तानने आधी या प्रकरणाची चौकशी संयुक्त राष्‍ट्र ाने करावी, अशी मागणी केली होती. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाºयांच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर तणाव निवळत असून त्यानंतर एकदाही युद्धविरामाचे उल्लंघन झालेले नाही.
नियंत्रण रेषेवर शांतता
गेल्या 48 तासांपासून नियंत्रण रेषेवर शांततेचे वातावरण आहे. बुधवारी रात्री बारा वाजता पूछ सेक्टरमधील बालनोईमध्ये पाककडून शेवटच्या वेळेस गोळीबार झाला होता. भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. तणाव निवळत चाललेला असला तरी भारतीय लष्कराकडून नियंत्रण रेषेवर सावधगिरी बाळगली जात आहे. सीमेपलीकडून कारवाई झाल्यास त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचे आदेश लष्कराला दिले गेले आहेत. दरम्यान, लष्करप्रमुख विक्रम सिंग उद्या शुक्रवारी शहीद जवान सुधाकरसिंग यांच्या गावास भेट देणार आहे.