आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलपंप, उद्योगांची हातमिळवणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागडे डिझेल घाऊक स्वरूपात विकण्याच्या केंद्राच्या धोरणामुळे राज्य सरकारेच नव्हे तर छोटे-मोठे उद्योग आणि कंपन्याही पंपचालक तसेच डेपोंशी हातमिळवणी करून फायदा उचलत आहेत.

बुधवारी रायपूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये सांकरा रोडजवळ निको फॅक्टरीतून पुरवठा विभागाने एक टँकर जप्त केले. यात कबीरनगर पेट्रोलपंपावरून आणलेले 18 हजार लिटर डिझेल होते. पंपानेही 2 हजाराच्या 9 पावत्या रीतसर दिल्या होत्या. जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी संजय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या टँकरमधून डिझेल पुरवले जात होते त्याचा करार बीपीसीएल कंपनीहून पेट्रोलपंपापर्यंत डिझेल पोहोचवण्यासाठी होता. या भागातील अनेक उद्योग सध्या पंपचालकांशी हातमिळवणी करून डिझेलचा साठा करत आहेत. यामुळे तेल कंपन्यांना रोज अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

गुरुवारी रांचीच्या बुटी मोड रोडवर न्यू गुमला पेट्रोलपंपावर विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यात 200 लिटरचे डिझेलने भरलेले 12 ड्रम होते. एखाद्या कारखान्यातच हे ट्रॅक्टर डिझेल घेऊन जाणार होते. याबद्दल विचारले असता पंपावरील कर्मचार्‍यांनी सांगितले की, ड्रममध्ये भरून डिझेल देण्यासाठी कंपनीने त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन घातलेले नाही. इंडियन ऑईल कार्पोरेशनचे बिहार-झारखंड विभागाचे उप महाव्यवस्थापक के. के. केशरी यांनी सांगितले की, घाऊक डिझेल महाग झाल्यानंतर घाऊक डिझेल खरेदी करणारे लोक अशा प्रकारे अनधिकृत डिझेल खरेदी करत असल्याची माहिती आहे. यात काही बांधकाम कंपन्याही सहभागी आहेत. हीच परिस्थिती ग्वाल्हेरच्या मालनपूर आणि बानमोर औद्योगिक क्षेत्रात पहावयास मिळते. या भागांत सुमारे 400 छोटे-मोठे उद्योग आहेत. येथे महिन्याकाठी दोन लाख लिटर घाऊक डिझेल विकले जायचे. यात सध्या 60 टक्के कपात झाली आहे.

इंडियन ऑईलचे संचालक (सेल्स) गोपालकृष्णन यांच्या मते, घाऊक डिझेल महाग झाल्याने गेल्या 12 दिवसांत याची विक्री 25 ते 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. रस्ते बांधकाम करणारे कंत्राटदार, जेपी सिमेंटच्या रिवा आणि बेला येथील कारखान्यांसह अनेक छोटे उद्योगांना केला जाणारा डिझेल पुरवठा सध्या थांबलेला आहे. मात्र, उद्योग सुरूच आहेत. याचाच अर्थ हे उद्योग चोरून डिझेल खरेदी करत आहेत.

शिव दुबे (रायपूर), रंजन सिंह (रांची), रामकृष्ण उपाध्याय (ग्वाल्हेर), गुरुदत्त तिवारी (भोपाळ)