आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petroliam Minister Jaipal Reddy Says Save Petrol

इंधन वाचवा, बचत करा; पेट्रोलियममंत्र्यांचे देशाला आवाहन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचा पेट्रोलियम मंत्रालयाचा मानस असून, नागरिकांनी इंधनबचत करावी, असे आवाहन पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी यांनी केले आहे.
कॅबिनेटमधील आपल्या सहकारी मंत्र्यांसह नगरविकास मंत्री कमलनाथ यांच्याशी ते याविषयी लवकरच चर्चा करणार आहेत. सार्वजनिक परिवहन व्यवस्था सुधारल्यास
पर्यावरणाचे रक्षणही होईल आणि इंधनाबाबत देश स्वयंपूर्ण होईल, असेही रेड्डी म्हणाले.
दिल्ली येथे पेट्रोलियम कंझर्व्हेशन रिसर्च असोसिएशनच्या (पीसीआरए) एका कार्यक्रमात रेड्डी म्हणाले की, शहरांमध्ये सार्वजनिक वाहन व्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे. मेट्रो, ट्रॅम, मोनो रेल, रॅपिड बस अशा वाहतूक व्यवस्थेला वेग देणे आवश्यक असून, बस ट्रांझिट सिस्टिमसाठी लवकरात लवकर जमीन दिली पाहिजे.
शहरांमधील रस्त्यांवर खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी असे करावे लागेल. केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने या विषयी राज्यांशी बोलणी करावी. आपण नगरविकासमंत्री असताना यावरच आपला भर होता. प्रत्येक शहरात मेट्रो सुरू व्हावी, असे कमलनाथ यांनाही वाटते. त्यांची भेट घेऊन या सिस्टिमला अजून वेग देण्यात येईल, अशी माहितीही जयपाल रेड्डी यांनी दिली.
आमच्या प्रतिनिधीस रेड्डी यांनी सांगितले की, इंदूर, भोपाळ, जयपूर, बंगळुरू, आंध्र प्रदेश, गुजरात व महाराष्टÑाने शहरी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला वेग देण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. यामुळे एकीकडे खासगी वाहनांची रस्त्यांवरील संख्या कमी होईल आणि दुसरीकडे देशही इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करील.

पीसीआरए पांढरा हत्ती
शेकडो कोटी रुपये बजेट असलेल्या पीसीआरएची अवस्था मागील अनेक वर्षांपासून पांढºया हत्तीसारखी झाली आहे. ही संस्था काही कामही करीत नाही आणि नवीन संशोधनही करीत नाही. कार्यक्रमाच्या नावाखाली वर्षातून एक-दोनदा प्रचार वाहन फेरी काढणे आणि पेट्रोलियममंत्री किंवा सचिवांकडून या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून घेणे एवढेच काम ही संस्था करते. या संस्थेच्या वेबसाइटवरील नमूद असलेल्या अधिकाºयांपैकी अर्ध्या लोकांचे फोन नंबर लागत नाहीत यावरूनच या संस्थेची निष्क्रियता लक्षात येते.

2 टक्के इंधनबचत, 10 हजार कोटींचा फायदा
केंद्रीय पेट्रोलियम सचिव जी.सी. चतुर्वेदी यांनी सांगितले की,
घरगुती बजेटमधील सुमारे 20 टक्के पैसे विविध इंधनांवर खर्च होतात. त्यामुळे दरवर्षी 2 टक्के इंधनाची बचत केली तरी दरवर्षी 10 हजार कोटी रुपयांची बचत होईल. प्रेशर कुकर वेळेवर गॅसवरून उतरवणे, गरज नसताना पंखे-एसी बंद करणे, अशा सवयी अंगी बाणवल्यास ही
बचत होऊ शकेल.

इंधन वाचवणे म्हणजे देशाबद्दल प्रेम व्यक्त करणे होय. देशाला तेलाच्या आयातीचे जास्त पैसे भरावे लागू नयेत, असे वाटत असेल तर सार्वजनिक परिवहन व्यवस्था सुधारावी लागेल. देश आपल्या गरजेपैकी 75 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे तेलाची बचत करणे किती गरजेचे आहे हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.
जयपाल रेड्डी, पेट्रोलियममंत्री