आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phone Tapping Issue Special Investigation Demand

फोन टॅपिंगप्रकरणी राज्यसभेत खडाजंगी; सरकारने फोन टॅप केल्याचा आरोप शिंदेंनी फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजप नेते अरुण जेटली यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून शुक्रवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. भाजपसह जनता दल (संयुक्त) व समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. हे फोन टॅपिंग सरकारनेच केल्याचा आरोप विरोधकांनी केला, परंतु गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याचे स्पष्टपणे खंडन करत हे प्रकरण गंभीर असून त्याची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.

जेटलींच्या पाच मोबाइलचे कॉल डिटेल्स कुणी तरी व्यक्तीने काढून घेण्याचा अवैध मार्गाने प्रयत्न झाला. इतरही काही नेत्यांचे फोन टॅप करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. परंतु शिंदेंनी त्याला दुजोरा दिला नाही. शिंदे यांनी सांगितले की, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या जेटलींचे फोन टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु हे फोन टॅपिंग सरकारने केलेले नाही. कुठलीही व्यक्ती किंवा संस्थांचे फोन टॅप करण्यास सरकारने कुणालाही सांगितलेले नाही. मात्र हे कुणी केले याची माहिती पोलिस तपासातून पुढे येईल. एअरटेलच्या अधिकार्‍यांकडे दिल्ली पोलिस दलातील सहायक पोलिस अधीक्षक (अभियान) दर्जाच्या अधिकार्‍याचा ई -मेल आला होता. यात जेटलींच्या मोबाइल फोन्सचे कॉल डिटेल्स मागवण्यात आले होते. परंतु या मेलची पुष्टी न झाल्याने कंपनीने त्यांना कॉल डिटेल्स दिलेले नाहीत. तरीही दिल्ली पोलिस याचा तपास करत आहेत.

याआधी भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, ‘या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने हे कबूल केले आहे की त्याने काही लोकांना 10-15 वेळा कॉल डिटेल्स दिलेले आहेत. सरकारने हे सांगावे की कॉल डिटेल्स मागणारी व्यक्ती कोण आहे.’ समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यांनी सांगितले की, ‘प्रकरण गंभीर आहे. जवळपास 100 खासदारांचे फोन टॅप झालेले आहेत. यामागे नेमके कोण आहे ते सरकारने शोधून काढावे.’ जदयू खासदार शिवानंद तिवारी, एन. के. सिंह व माकप नेता सीताराम येचुरी यांनीही त्यांचे दूरध्वनी टॅप केले जात असल्याचा आरोप केला. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली व सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी चर्चा केली.

इस्रायलवरून मशीन
तपासानुसार अनुरागने इस्रायल व इतर देशांतून एनक्रिप्टेड यंत्रणा खरेदी मागवली. ही सामग्री किंवा सॉफ्टवेअर लष्कर किंवा गुप्तचर संस्था फोन टॅपिंगसाठी वापरतात. याच्या मदतीने कुठल्याही व्यक्तीचे कॉल किंवा ई-मेल्स तपासणी केली जाऊ शकते.

गडकरींसह 60 नेत्यांचे कॉल डिटेल्सही काढले
पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या कॉम्प्युटरमधून 60 पेक्षा जास्त लोकांच्या कॉल डिटेल्सची माहिती मिळाली आहे. त्यात भाजप नेते नितीन गडकरी, विजय गोयल, सुधांशू मित्तल, आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी, मुंबईचे व्यावसायिक नितीश शाह यांचे डिटेल्स काढण्यात आल्याची माहिती आहे. अनुराग सिंह या व्यक्तीने या सर्व लोकांच्या कॉल डिटेल्स काढल्याची पोलिस तपासातील प्राथमिक माहिती आहे.