आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचोरी नव्हे, भांडणांमुळे लेट झाले उड्डाण ; स्मृती त्रेहन यांची बाजू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कांदा-कचोरीसाठी एअर इंडियाची महिला वैमानिक मुंबईहून जोधपूरच्या विमानात गेली. तिची ड्यूटी दिल्लीकडे जाणार्‍या विमानात होती. त्यामुळे दिल्लीचे विमान तासभर लेट झाले. गेल्या शनिवारच्या या घटनेने एअर इंडियाच्या कारभाराची लक्तरे हवाई मार्गावर टांगली गेली आहेत.

आरोपी वैमानिक कॅप्टन स्मृती त्रेहन आणि एअर इंडियाचे प्रवक्ते प्रवीण भटनागर या दोघांचेही म्हणणे आहे की, खोडसाळ लोकांचे हे कारस्थान आहे. भटनागर म्हणाले की, त्रेहन यांच्याविरुद्ध काहीही कारवाई केलेली नाही. त्यापूर्वी एअर इंडियाचे अधिकारी म्हणाले होते की, ते वस्तुस्थितीचा शोध घेत आहेत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कॅप्टन त्रेहन एकही विमान उडवणार नाहीत. मात्र, आता एअरलाइन्स सांगत आहे की, कॅप्टन त्रेहन दोन दिवस सुटीवर होत्या आणि शनिवारपासून पुन्हा पूर्वीप्रमाणेच उड्डाण करतील. त्रेहन यांनी सांगितले की, त्यांना कोणत्याही प्रकारची कचोरी आवडत नाही. त्यामुळे जोधपूरहून कचोरी आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या म्हणाल्या की, ‘मला जे विमान उडवण्याचा आदेश मिळाला होता तेच विमान मी उडवले. माझी प्रतिमा कलंकित करण्याचा हा प्रयत्न आहे.’ एअर इंडियानेही हे कुणाचे तरी खोडसाळ कृत्य असल्याचे म्हटले आहे.

इंडियन एअरलाइन्सच्या कर्मचारी विभागप्रमुख दीपा महाजन यांच्या मते, मुंबई कार्यालयातील चौकशीत काहीही गैरप्रकार निष्पन्न झाला नाही. इतर वैमानिकांच्या मते या वादामागे वैमानिकांची अंतर्गत भांडणे आहेत. या कंपनीत वैमानिकांविरुद्ध कारवाई होत नाही. संप करणार्‍यांविरुद्धही नाही आणि सहकारी वैमानिकाविरुद्ध वावड्या उठवणार्‍यांविरुद्धही कारवाई होत नाही.

प्रकरण काय होते : शनिवारी 12 वाजता मुंबई-जोधपूर-दिल्ली (एआय-476) फ्लाइट घेऊन जाण्याची जबाबदारी कॅप्टन स्मृती त्रेहन यांच्यावर होती. नंतर काही कारणामुळे ऐनवेळी 2 वाजता मुंबई-दिल्ली फ्लाइटवर (एआय-422) त्यांना शिफ्ट करण्यात आले. मात्र त्रेहन दोन वाजेऐवजी पूर्वी ठरलेली फ्लाइटच घेऊन गेल्या. जोधपूर विमानतळावर त्यांनी कांदा-कचोरीची ऑर्डर आधीच देऊन ठेवली होती, अशा बातम्या आल्या होत्या.