आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या चिंतन शिबिराला जयपूरमध्ये सुरूवात, सोनियांनी फुंकले रणशिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- आखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी)चे आजपासून जयपूरमध्ये तीनदिवसीय चिंतन शिबिर सुरु झाले. या शिबिराचे उदघाटन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. तसेच त्यांनी देशभरातून आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेस आघाडीच्या यूपीए सरकारने गेल्या नऊ वर्षात देशाची आर्थिक स्थिती मजबूत केली. सध्या भारतासह जगभर आर्थिक मंदी आहे. त्यातून आपल्याला वाट काढावी लागेल. यूपीए सरकारने आर्थिक विकासासाठी अनेक निर्णय घेतले. पण त्याला इतर पक्षांची साथ लाभली नाही. देशाला विकासाची फळे चाखायची असतील तर सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. सामाजिक स्थितीबाबतही सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. देशात महिलांवर वाढते हल्ले हे शरमेची बाब आहे. दिल्लीतील सामूहिक घटनेने तर आपल्या सर्वांची मान लाजेने झुकली आहे. महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत.

काँग्रेस पक्षाच्या सरकारने देशातील नागरिकांसाठी व गोरगरिबांसाठी काम केले आहे. गरीब लोकांच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्षाने कायमच चांगले काम केले आहे. यापुढेही ते होत राहील. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाची धोरणे व योजना लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. काँग्रेस हा एकमेव गावा-गावांत पोहचलेला पक्ष असून, त्याद्वारे पक्षाला बळकट करण्याची गरज आहे.

काँग्रेस पक्षात रचनात्मक पातळीवर बदल अपेक्षित असून पक्ष संघटना मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत सोनिया म्हणाल्या, पक्षात युवकांना संधी मिळाली पाहिजे. युवकांनी विधायक कामात गुंतवून घेतले पाहिजे. लग्न, वाढदिवस या समारंभात वायफळ खर्च होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवण्याची गरज असून, त्यामुळे शांतता नांदण्यास मदत होते, असे सोनिया यांनी सांगितले.

काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते जयपूरात- काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल गांधी दुपारी 2 वाजता विमानाने जयपूरला दाखल झाले. शिबिरात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग विशेष विमानाने दुपारी बारा वाजता जयपूरमध्ये पोहचले. राज्यस्थानच्या राज्यपाल मार्गारेट आल्वा आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. त्याआधी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, वीरप्पा मोईली, सचिन पायलट, कमलनाथ, सुशीलकुमार शिंदे आणि भूपेंद्र हुड्डा जयपुरमध्ये दाखल झाले आहेत.

या शिबीरासाठी काँग्रेसचे महत्त्वाचे 310 व्हीव्हीआयपी नेते जयपूरमध्ये पोहचले आहेत. केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, आंध्रप्रदेशचे सीएम किरण रेड्डी, मणिपूरसह विविध काँग्रेस राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. येथील बिर्ला सभागृहात होणा-या कार्यक्रमासाठी कडक व चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

काय होणार आहे चिंतन शिबिरात?- काँग्रेस या चिंतन शिबीरात पुढील वर्षी होणा-या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणूकीसाठी नेत्यांना व कार्यकर्त्यांना तयार राहा, असा संदेश देणार आहे. याचबरोबर मनमोहनसिंग सरकारने मागील आठ-नऊ वर्षात जी काही कामे केली त्याची माहिती देशातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगणार आहे. याचबरोबर देशातील सध्या भेडसावत असलेल्या समस्या, प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आज ऊहापोह करणार आहे.
काँग्रेसने यासाठी पंचसूत्री अजेंडा तयार केला आहे. यात देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणे, महिला सक्षमीकरण, काँग्रेस पक्षात युवा नेत्यांना संधी देणे, काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे स्थान अधोरेकित करणे या पाच मुद्यांवर भर दिला जाणार आहे.
आर्थिक व सामाजिक स्थैर्य या विषयाची जबाबदारी सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्याकडे सोपाविण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण्याबाबतच्या धोरणाची जबाबदारी गिरीजा व्यास, काँग्रेस पक्षांत युवकांना संधी याबाबतची जबाबदारी सचिन पायलट व कमलनाथ यांच्याकडे देण्यात आली आहे. जागतिक पातळीवर भारत याबाबतची जबाबदारी आनंद शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, काँग्रेस पक्षाला संघटनात्मक पातळीवर बळकट करण्याची जबाबदारी गुलाम नबी आझाद यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.