आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब; भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘नमो’च्चार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात दुसर्‍या दिवशीही गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची हवा होती. सर्वच नेत्यांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले. कुणी त्यांच्या विकास मॉडेलचा तर कुणी प्रशासकीय कार्यशैलीचा दाखला दिला. सलग दुसर्‍या दिवशी व्यासपीठावर मोदींचे अभिनंदन करून भाजपने एक प्रकारे त्यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले. शनिवारी मोदींचा हा सन्मान केला जात असताना उपस्थित सुमारे 4 हजार प्रतिनिधींनी उभे राहून त्यांच्या कार्याला पावती दिली.

राष्ट्रीय राजकारणात आता मोदींवर मोठी जबाबदारी दिली जाण्याचेच हे संकेत मानले जात आहेत. तालकटोरा स्टेडियममध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी सत्कार करण्यासाठी मोदींचे नाव घेताच उपस्थित प्रतिनिधी उभे राहिले. मोदींनी व्यासपीठावर राजनाथसिंह यांची गळाभेट घेतली. ‘एखाद्या राज्यात भाजपच्या एकाच नेत्याने विजयाची हॅट्ट्रिक करावी, असे कधीच घडले नव्हते. म्हणूनच मोदी या सन्मानाचे खरे दावेदार आहेत,’ अशा शब्दांत राजनाथ यांनी मोदींचा गौरव केला. अडवाणींचाही गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख करत त्यांनी वाकून नमस्कार केला.

नव्या जोडीवर जबाबदारी
जनसंघ आणि भाजपमध्ये नेतृत्व नेहमीच संघ आणि भाजपशी तेवढीच जवळीक असलेल्या व्यक्तीकडे असते. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर आता मोदी-राजनाथ जोडीवर ही जबाबदारी आली आहे.

दहशतवादाविरुद्ध कठोर कायदा हवा
पाकिस्तानने भारताविरुद्ध छुपे युद्ध छेडले आहे. सीमेवर दहशतवाद, शस्त्रांचा अवैध मार्गाने पुरवठा, मादक पदार्थ आणि बनावट नोटांची तस्करी तसेच घुसखोरीसारखे तंत्र पाकने अवलंबले आहे. यासाठी देशाला अत्यंत कठोर अशा दहशतवादविरोधी कायद्याची गरज असल्याचे राजनाथसिंह म्हणाले.