आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाक विमा योजनेच्या प्रचार खर्चावर प्रश्नचिन्ह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डाक विभागाच्या जीवन विमा पॉलिसीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावरून उच्चस्तरीय कार्यगटाने असहमती दर्शवली आहे. या प्रस्तावात डाक विभागाच्या जीवन विमा पॉलिसी योजनांच्या प्रचारासाठी 500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची सूचना करण्यात आली असून एवढ्या मोठ्या तरतुदीची गरजच काय, असा सवाल या कार्यगटाने केला आहे. त्यामुळे डाक विभाग या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.
बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात डाक विभागासाठीच्या कार्य योजनांबाबत शिफारशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय कार्यगटाने डाक विमा योजनेच्या प्रचारासाठी 500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवर आक्षेप घेतला आहे. या प्रस्तावात बाराव्या योजनेच्या 2012- 2017 या पंचवार्षिक काळात विमा उत्पादनांच्या प्रचारासाठी दूरचित्रवाणी, नभोवाणी, वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहिराती, आऊटडोअर प्रसिद्धीसाठी होर्डिंग्ज लावणे, एक लाख गावांमध्ये वॉलपेंटिंग करण्याबरोबरच एसएमएसद्वारे मार्केटिंग करण्याचा इरादा व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी 500 कोटी रुपयांच्या तरतुदीचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, कार्यगटाने ही रक्कम अवाजवी असल्याचे सांगत आक्षेप नोंदवला आहे. डाक विभागाने डाक विमा योजनेच्या माध्यमातून 15 दशलक्ष नवीन ग्राहक जोडण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.