आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Press Council Chairman Is Real Congressy Arun Jetali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष काटजू अस्सल काँग्रेसी -अरुण जेटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकमुळे संतापलेले भाजप नेते अरुण जेटली यांनी न्या. काटजू काँग्रेसवाल्यांपेक्षाही अधिक काँग्रेसी असल्याचे म्हटले आहे. राजकारण करायचे असेल तर काटजूंनी पद सोडावे. नाहीच सोडले तर त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही जेटली यांनी केली.
एका दैनिकात लिहिलेल्या लेखात न्या. काटजू यांनी मोदींवर टीका केली आहे. यावर जेटली यांनी रविवारी एक लेख लिहून प्रत्येक मुद्द्याचा समाचार घेतला. जेटली म्हणतात, ‘बिगर काँग्रेसी राज्य सरकारवर न्या. काटजू यांनी टीका करणे म्हणजे प्रेस कौन्सिलचे पद देणा-या लोकांचे जणू आभार मानण्यासारखे आहे. हे पद केवळ घटनात्मकच नाही तर अर्धन्यायिक स्वरूपाचे आहे.’

न्या. काटजू यांनी केलेले आरोप वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. महत्त्वाच्या पदावर असताना जाहीरपणे ते राजकारण कसे करू शकतात. जेव्हा यूपीए सरकारच्या टू-जी आणि कोळसा घोटाळ्यावर भाष्य करावयाचे असते तेव्हा ते मूग गिळून गप्प असतात, असेही जेटली यांनी म्हटले आहे.

जेटलींच्या या प्रत्युत्तरावर न्या. काटजू यांनीही खुलासा केला. लेखातील तथ्यांश न पडताळता जेटली चुकीचा अर्थ लावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर पोस्ट करणा-या दोन तरुणींना अटक करणा-या महाराष्‍ट्र सरकारचाही आपण निषेध केला होता, याची आठवण न्या . काटजू यांनी करून दिली. बिहारमध्ये माध्यमांच्या गळचेपीबद्दल प्रेस कौन्सिलनेच अहवाल दिला होता. हिमाचल प्रदेशात सरकारच्या कार्यप्रणालीवरही कौन्सिलने यापूर्वी टीका केली असल्याचे न्या. काटजू यांनी म्हटले आहे.

काय लिहिले होते न्या. काटजूंनी?
एका दैनिकात न्या. काटजू यांनी लिहिलेल्या लेखात गुजरातबद्दल मत मांडले होते. ते म्हणतात, उद्योजक घराण्यांना सवलती देणे, त्यांना स्वस्तामध्ये जमिनी व वीज देणे म्हणजे विकास नव्हे. जोवर यामुळे जनतेचे जीवनमान उंचावत नाही तोवर हा विकास मानलाच जाऊ शकत नाही. या लेखात काटजू यांनी आकडेवारी देऊन गुजरातच्या विकासाची माहिती दिली आहे. देशाच्या भवितव्याविषयी कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवावे, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले आहे. अन्यथा 1933 मध्ये जर्मनीच्या लोकांनी जी चूक केली तशी तुमच्याही हातून होऊ शकेल, असा इशाराही काटजू यांनी दिला आहे.

मोदींचे ट्विट
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्विट करताना म्हटले आहे की, न्या. काटजू पूर्वग्रहदूषित नजरेने गुजरातकडे पाहत आहेत. गुजरातबद्दल त्यांनी केलेल्या अपप्रचाराचे जोरदार खंडन जेटली यांच्या लेखातून पहावयास मिळते.