आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prime Minister Gives Green Signal To Mumbai Ahamedabad Bullet Train

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला हिरवा कंदील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विकास साधायचा असेल तर प्रमुख सुधारणा मार्गातील अडथळे तातडीने दूर करायला हवेत. देशात गुंतवणुकीस पोषक वातावरण तयार करण्यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलणार आहोत, असे मत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त केले. आजारी प्रकल्प आणि प्रमुख पायाभूत क्षेत्राची खुंटलेली वाढ यासंदर्भात चिंता व्यक्त करून पंतप्रधानांनी रेल्वे, कोळसा, ऊर्जा, नागरी वाहतूक आदी मंत्रालयांच्या सचिवांची बैठक बोलावली होती. विकास साधायचा असेल तर पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ व्हायला हवी, असे सांगत त्यांनी या मंत्रालयांना आगामी काळातील विकासासाठी उद्दिष्टे दिली.
जहाज आणि बंदरे मंत्रालयासाठी 2012-13 या वर्षात 35,000 कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य दिले आहे. गेल्या आर्थिक वर्षात या क्षेत्रासाठी 16,585 कोटींचे लक्ष्य होते. नागरी वाहतूक क्षेत्राला चालू आर्थिक वर्षासाठी पब्लिक-प्रायव्हेट भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून 8,798 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी या क्षेत्राला 4,877 कोटींचे लक्ष्य होते. देशात दोन एव्हिएशन हबची निर्मिती करण्यात येणार आहे. लखनऊ, वाराणसी, कोइंबतूर, त्रिची आणि गया येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे उभारण्यात येतील, अशी माहिती पंतप्रधानानी दिली. चालू आर्थिक वर्षात दिल्ली आणि चेन्नई येथे नवे एअरलाइन हब उभारण्यात येतील. पूर्व किनारपट्टी (आंध्र प्रदेश) आणि पश्चिम बंगाल किनार्‍यावर दोन नवी बंदरे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी 20,500 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यंदा 9,500 किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणण्यात येणार आहेत. रेल्वेसाठी 20,000 कोटींच्या गुंतवणुकीचे पीपीपीच्या माध्यमातून सोन्नगर-दानकुणी आणि मुंबईत कॉरिडॉर उभारण्यात येणार आहेत.
ऊर्जा क्षेत्राला 17,957 मेगावॅटच्या वीज निर्मितीचे लक्ष्य देण्यात आले आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेल्या कुडानकुलम अणु प्रकल्पातून 2000 मेगावॅट वीजनिर्मितीचाही यात समावेश आहे.


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला हिरवा कंदील
रेल्वेमंत्री गैरहजर असलेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी 500 किलोमीटरच्या मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. या प्रकल्पासाठी 60,000 कोटी रुपयांचा खर्च अंदाजित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर 350 किलोमीटर प्रतितास या वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे चार ते पाच तास वेळ वाचणार आहे.