आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरवधूंच्या गावात घुमणार सनई चौघडे

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालनपूर(गुजरात) - उत्तर गुजरातमध्ये देहव्यापारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या वाडिया गावातही आता सनई चौघड्याचे सूर घुमणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनंतर या गावातील लोक आपल्या विवाहयोग्य मुलामुलींच्या सामूहिक विवाहासाठी तयार झाले आहेत. आगामी 11 मार्चला गावातील आठ जोडप्यांचा विवाह होणार असून आठ जोडप्यांचा साखरपुडा होणार आहे.
राजस्थानच्या सीमेलगत गुजरातच्या बनासकाठा जिल्ह्यात असलेले वाडिया गाव देहव्यापारासाठी कुप्रसिद्ध आहे. बनासकाठापासून सुमारे 80 किलोमीटर दूर असलेल्या या गावातील तरुण मुली देहविक्रय करतात व मुले या व्यवसायात दलाली करून पैसे मिळवतात.
शासकीय पातळीवरून या गावातील लोकांना या व्यवसायापासून परावृत्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. परंतु या लोकांनी प्रतिसाद दिला नाही. घुमंतू जाती समुदाय मंच नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेने या वडाळी लोकांचे प्रबोधन करून त्यांना मुलामुलींच्या विवाहासाठी तयार केले.
या संघटनेच्या समन्वयक मिताली पटेल यांच्या मते या लोकांनी मुलामुलींच्या विवाहाचा निर्णय घेऊन धाडस दाखवले आहे. पूर्वीही या गावातील एक दोन मुला-मुलींचे विवाह झाले आहेत, परंतु एकदम आठ जणांचे विवाह व आठ जणांचा साखरपुडा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सोहळ्याचा आदर्श घेऊन गावातील मुलींचे विवाह होण्यास सुरुवात झाली तर येथील देहविक्रयाची परंपरा बंद होईल, असेही पटेल म्हणाल्या.