आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच वेळी तीन यकृतांचे प्रत्यारोपण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एक वर्ष वय असलेल्या अनिसचे यकृत नीट काम करीत नव्हते. त्याच्या आई-वडिलांची इच्छा असूनही ते आपल्या मुलाला स्वत:चे यकृत देऊ शकत नव्हते. त्याचप्रमाणे तीन वर्षांची तेजश्री आणि 22 महिन्यांची अंशा यांच्या यकृतांमध्येही बिघाड होता. विशेष म्हणजे तेजश्रीच्या वडिलांचा रक्तगट अंशाशी आणि अंशाच्या वडिलांचा रक्तगट तेजश्रीच्या रक्तगटाशी जुळत होता. अशा परिस्थितीत या तिन्ही मुलांना संजीवनी देण्याचे काम डॉक्टरांच्या कौशल्याने केले. तेजश्रीचे यकृत अनिसच्या शरीरात, तेजश्रीच्या वडिलांचे यकृत अंशाच्या शरीरात आणि अंशाच्या वडिलांचे यकृत तेजश्रीच्या शरीरात ट्रान्सप्लांट करण्यात आले.
एक हजारांपेक्षा जास्त यकृतांचे प्रत्यारोपण करण्याचा अनुभव असलेल्या डॉ. ए. एस. सोएन यांच्या नेतृत्वाखाली गुडगाव येथील मेदांता रुग्णालयातील 40 डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा-यांसह 110 जणांच्या पथकाने एकाच वेळी ही तिन्ही यकृते ट्रान्सप्लांट करण्याची अतुलनीय कामगिरी केली आहे. डॉ. सोएन यांनी सांगितले की, सुमारे वीस तास सहा ऑपरेशन थिएटर्समध्ये या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एकाच वेळी तीन रुग्णांवर लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची ही जगातील पहिलीच केस असल्याचा दावाही त्यांनी केला. अनीस हा लिव्हर ट्रान्सप्लांट केलेला जगातील सर्वात लहान रुग्ण असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

कशा केल्या शस्त्रक्रिया : डॉ. सोएन यांनी सांगितले की, तेजश्रीची शस्त्रक्रिया करण्यात ब-याच अडचणी होत्या. तिला जास्त वेळ उपाशी ठेवणे शक्य नव्हते. तेजश्री व तिचे यकृतदाता आणि अनीसच्या शस्त्रक्रियेने सुरुवात करण्यात आली. दीड तासाने अंशा आणि तिच्या यकृतदात्याची शस्त्रक्रिया
सुरू करण्यात आली.
आव्हान : डॉ. विजय व्होरा यांनी सांगितले की, लहान मुलांच्या शस्त्रक्रियेत संतुलन राखणे हे सर्वात मोठे आव्हान असते. रक्ताच्या तीस महत्त्वाच्या पॅरॉमीटर्सवर लक्ष ठेवणे आणि इंट्राव्हीनस औषधांचे डोस देणे, असे अनेक पैलू यात असतात. या सर्व मुलांचे वजन 10 ते 12 किलो असल्याने शृंखल शस्त्रक्रियेतील आव्हान तीन पटींनी वाढले होते.

का केल्या शस्त्रक्रिया
ऑपरेशन करणा-या पथकातील प्रमुख सदस्य डॉ. नीलम मोहन यांनी सांगितले की, गुजरातच्या गांधीधाम येथील तीन वर्षांची तेजश्री हिला मेपल सिरप युरीन डिसीज (एमएसयूडी) हा विकार होता. यात शरीरामध्ये एका विशिष्ट एंझाइमचे प्रमाण वाढते. त्यामुळे रुग्णाला प्रथिने पचवता येत नाहीत. त्यामुळे एका अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण शरीरात वाढू लागते व यकृत खराब होण्याची शक्यता वाढते. जम्मू- काश्मीर येथील अंशाच्या शरीरात तर पित्ताशयच नव्हते.